citynewsLatest NewsMaharashtraWashim

वाशिममध्ये ‘गुप्तधन’ शोधाचा थरार; बंद पडलेल्या रमेश टॉकीजमध्ये खोदकाम करताना 6 जण ताब्यात

वाशिम शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि रहस्यमय घटना समोर आली आहे. अनेक वर्षांपासून बंद असलेल्या रमेश टॉकीज परिसरात कथित गुप्तधनाच्या शोधासाठी रात्रीच्या अंधारात खोदकाम सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांच्या डीबी पथकाने धाड टाकत सहा जणांना ताब्यात घेतले.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील बंद पडलेल्या रमेश टॉकीज परिसरात मागील काही दिवसांपासून संशयास्पद हालचाली सुरू होत्या. रात्रीच्या वेळी काही जण गुप्तपणे खोदकाम करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली.

या कारवाईदरम्यान घटनास्थळावरून मेटल डिटेक्टरसह खोदकामासाठी वापरले जाणारे काही साहित्य जप्त करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळावरून सहा जणांना ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात आणले. त्यांची रात्री उशिरापर्यंत सखोल चौकशी करण्यात आली.

मात्र या प्रकरणाबाबत पोलिस प्रशासनाने अद्याप अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. त्यामुळे शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, या प्रकरणात काही राजकीय कार्यकर्त्यांची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच काहीजण आपली नावे या प्रकरणातून वगळण्यासाठी प्रयत्न करत असल्याचीही चर्चा आहे. या दाव्यांना मात्र अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

रमेश टॉकीज परिसरात खरोखरच काही गुप्तधन दडले होते का, की हा केवळ अफवांवर आधारित प्रयत्न होता, याचा उलगडा पोलिस तपासानंतरच होणार आहे.

या रहस्यमय प्रकरणामुळे वाशिम शहरात एकच खळबळ उडाली असून पुढील तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button