अमरावती उत्सव मेळ्यातील वाद जीवघेणा; कोलकात्याच्या व्यावसायिकाचा मृत्यू, हत्या कलमाची भर

अमरावतीच्या सायन्स कोर मैदानात भरलेल्या उत्सव मेळ्यात झालेल्या वादाने आता गंभीर वळण घेतले आहे. मेळ्यात झालेल्या भांडणात जखमी झालेल्या कोलकाता येथील 55 वर्षीय अभिजीत कर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी प्रकरणात हत्या कलमाची भर घालत मुख्य आरोपी अजीज गोठीवाला याला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 7 मे रोजी दुपारच्या सुमारास मेळ्यात काही व्यक्तींमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर हा वाद हिंसक स्वरूपात बदलला. दारूच्या नशेत सुरू झालेल्या या वादादरम्यान अभिजीत कर यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे.
गंभीर जखमी झालेल्या अभिजीत कर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मेळ्यातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मृतक अभिजीत कर हे कोलकाता येथील रहिवासी असून उत्सव मेळ्यात व्यावसायिक कारणासाठी आले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, मृतकाच्या सहकाऱ्यांनी हल्ल्यात आणखी काही जण सहभागी असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे. घटनास्थळावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपींची भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
विशेष म्हणजे, मेळ्याच्या आत सीसीटीव्ही व्यवस्था नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये पुरेशी सुरक्षा आणि देखरेख यंत्रणा असणं आवश्यक असल्याची मागणी आता जोर धरत आहे.
या घटनेनंतर अमरावतीतील विविध सामाजिक संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज सकाळी सायन्स कोर मैदानात आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
सिटी कोतवाली पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, इतर संशयितांची भूमिकाही तपासली जात आहे. आता या प्रकरणात आणखी कोणती माहिती समोर येते आणि पोलिसांची पुढील कारवाई काय होते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.



