citynewsLatest NewsMaharashtraNagpur

निकालाचा धक्का अन् आयुष्य संपलं… देवलापारमध्ये बारावीच्या विद्यार्थ्याची हृदयद्रावक आत्महत्या

रामटेक/देवलापार : बारावीच्या निकालानंतर अपयशाचा धक्का सहन न झाल्याने १८ वर्षीय विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचलल्याची हृदयद्रावक घटना देवलापार परिसरात उघडकीस आली आहे.
ही घटना केवळ एका विद्यार्थ्याच्या मृत्यूपुरती मर्यादित नसून, विद्यार्थ्यांवरील वाढत्या मानसिक तणावाचं गंभीर वास्तव अधोरेखित करणारी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नावेल होलाराम खंडाते (वय १८) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो भंडारा जिल्ह्यातील रोंगा गावचा रहिवासी होता. नावेल हा रामटेक तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा, बेलदा येथे बारावीचे शिक्षण घेत होता.

अभ्यासू, शांत आणि जिद्दी स्वभावाचा म्हणून ओळखला जाणारा नावेल बारावीच्या परीक्षेत चांगले यश मिळवेल, अशी शिक्षकांसह कुटुंबीयांनाही अपेक्षा होती. मात्र जाहीर झालेल्या निकालात त्याला इंग्रजी, मराठी आणि अर्थशास्त्र या विषयांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने तो नापास झाला.

निकालाचा धक्का बसल्यानंतर नावेल मानसिकदृष्ट्या खचला असल्याची माहिती समोर येत आहे. दुपारच्या सुमारास तो घराबाहेर गेला. मात्र बराच वेळ उलटूनही तो परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. त्यानंतर त्याचा मृतदेह शेतात आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

कुटुंबीयांच्या माहितीनुसार, नावेलने यापूर्वीही अपयशाचा सामना केला होता. मात्र त्याने त्यातून सावरत पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी मात्र निकालाचा धक्का त्याच्यासाठी असह्य ठरल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

या घटनेनंतर देवलापार परिसरासह रोंगा गावात शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज

परीक्षेतील अपयश हा आयुष्याचा शेवट नसतो. मात्र वाढती स्पर्धा, अपेक्षांचं ओझं आणि अपयशाची भीती यामुळे अनेक विद्यार्थी मानसिकदृष्ट्या खचत असल्याचं वास्तव या घटनेतून पुन्हा अधोरेखित झालं आहे.

विद्यार्थ्यांनी अपयशाकडे शेवट म्हणून नव्हे, तर नव्या सुरुवातीची संधी म्हणून पाहण्याची गरज आहे. त्याचवेळी पालक, शिक्षक आणि समाजाने विद्यार्थ्यांशी सतत संवाद साधत त्यांना मानसिक आधार देणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

एक निकाल…
एक धक्का…
आणि संपलेलं एक आयुष्य…

देवलापारमधील ही घटना समाजाला अंतर्मुख करणारी असून, विद्यार्थ्यांच्या मनातील ताण समजून घेण्याची हीच खरी वेळ आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button