citynewsIndia NewsLatest News

लखनऊ विमानतळावर माकडांचा धुडगूस; धावपट्टीवर माकडं आल्याने IndiGo विमानाचं टेक-ऑफ रद्द

लखनऊ विमानतळावर गुरुवारी सकाळी एक अनोखी पण गंभीर घटना घडली. धावपट्टीवर अचानक माकडांचा कळप आल्याने इंडिगोचं रायपूरकडे जाणारं विमान टेक-ऑफच्या क्षणी थांबवावं लागलं. सुदैवाने वैमानिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोचं 6E 6521 हे विमान गुरुवारी सकाळी सुमारे ९ वाजता लखनऊहून रायपूरकडे उड्डाणासाठी सज्ज होतं. विमानात सुमारे १५० प्रवासी प्रवास करत होते. विमानाने धावपट्टीवर वेग घेत टेक-ऑफ रोल सुरू केला होता आणि विमान जवळपास २० ते ३० टक्के धावपट्टी पार करत असतानाच वैमानिकांना धावपट्टी ओलांडत जाणारा माकडांचा कळप दिसला.

परिस्थितीची गंभीरता ओळखून वैमानिकांनी तात्काळ टेक-ऑफ रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि विमान सुरक्षितपणे थांबवले. या प्रसंगामुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले, मात्र सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे.

विमानाचे टेक-ऑफ अचानक रद्द केल्यामुळे मोठ्या प्रमाणात इंधन खर्च झाले. त्यामुळे विमानाला पुन्हा इंधन भरावे लागले. या प्रक्रियेमुळे विमानाच्या उड्डाणास उशीर झाला, तसेच विमानतळावरील इतर काही उड्डाणांच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला.

या घटनेनंतर विमानतळ प्रशासनाने धावपट्टी परिसरातील वन्यप्राणी नियंत्रण आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विमानतळ परिसरात माकडांचा वावर रोखण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

वैमानिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली असली, तरी ही घटना विमानतळ सुरक्षेसाठी गंभीर इशारा मानली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button