अमरावतीत डिजिटल जनगणनेला सुरुवात; ‘स्व-गणना’ करून नागरिकांना सहभागाचे आवाहन

अमरावती शहरात आजपासून जनगणना मोहिमेला अधिकृत सुरुवात झाली असून, यंदाची जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने पार पडणार आहे. नागरिकांना ‘स्व-गणना’ अर्थात Self Enumeration ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, मोबाईल किंवा संगणकाच्या माध्यमातून नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाइन भरता येणार आहे.
१ मे ते १५ मे या कालावधीत नागरिकांना ‘स्व-गणना’ करण्याची संधी देण्यात आली आहे. यासाठी केंद्र सरकारने se.census.gov.in हे अधिकृत पोर्टल सुरू केले असून, या माध्यमातून नागरिक घरबसल्या स्वतःची जनगणना पूर्ण करू शकतात. विशेष म्हणजे, यंदाच्या जनगणनेत प्रथमच डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून, ही भारतातील पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना ठरणार आहे.
अमरावतीत या मोहिमेचा शुभारंभ शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवानी, खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार सुलभाताई खोडके, आमदार रविभाऊ राणा, उपमहापौर सचिन भेंडे आणि स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांनी स्वतः ‘स्व-गणना’ करून या मोहिमेला सुरुवात केली. यावेळी नागरिकांसमोर आदर्श निर्माण करत सर्वांनी या राष्ट्रीय उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले.
मान्यवरांनी सांगितले की, जनगणना ही केवळ सरकारी प्रक्रिया नसून देशाच्या विकासाचा पाया आहे. अचूक आणि अद्ययावत माहितीच्या आधारे शासनाला विविध विकास योजना, सुविधा आणि कल्याणकारी धोरणे अधिक प्रभावीपणे राबवता येतात. डिजिटल जनगणनेमुळे माहिती नोंदविण्याची प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि सुरक्षित होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
स्व-गणना पूर्ण केल्यानंतर नागरिकांना Self Enumeration ID (SE ID) मिळणार असून, त्यानंतर १६ मे ते १४ जून दरम्यान जनगणना कर्मचारी घरोघरी भेट देऊन माहितीची पडताळणी करणार आहेत. म्हणजेच स्व-गणना केली तरीही प्रशासनाची प्रत्यक्ष भेट होणार आहे.
अमरावतीत सुरू झालेल्या या डिजिटल जनगणना मोहिमेला नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नागरिकांनी वेळेत ‘स्व-गणना’ पूर्ण करून या महत्त्वाच्या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



