AmravaticitynewsCrime NewsLatest NewsMaharashtraMaharashtraCrime

नागपुरी गेट पोलिसांचा तडीपार गुन्हेगारांवर बडगा

दोन वेगवेगळ्या कारवायांत दोन आरोपी अटकेत; कोयता आणि तलवार जप्त

अमरावती | प्रतिनिधी

अमरावती शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तडीपार गुन्हेगारांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत नागपुरी गेट पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले आहे. गुन्हे प्रकटीकरण पथकाने दोन स्वतंत्र कारवायांमध्ये दोन तडीपार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून धारदार कोयता आणि तलवार जप्त केली आहे. सार्वजनिक ठिकाणी शस्त्रांसह फिरून दहशत निर्माण करणाऱ्या या आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 जून रोजी नागपुरी गेट पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाला गुप्त माहिती मिळाली की, एक तडीपार आरोपी अकॅडमिक स्कूलच्या मैदान परिसरात संशयास्पदरीत्या फिरत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली.

यावेळी तोंडाला रुमाल बांधून अंधाराचा फायदा घेत फिरत असलेल्या जब्बार खान रऊफ खान (वय 28 वर्षे, रा. अन्सार नगर) याला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक लोखंडी धारदार कोयता जप्त करण्यात आला. जप्त कोयत्याची किंमत अंदाजे 500 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

यानंतर 18 जून रोजी पुन्हा एकदा मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे डीबी पथकाने सौदागरपुरा येथील मोकळ्या मैदान परिसरात कारवाई केली. येथे इरफान खान रहेमान खान (वय 38 वर्षे, रा. रहेमत नगर) हा हातात तलवार घेऊन परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक धारदार लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. या तलवारीची किंमत अंदाजे एक हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

दोन्ही आरोपी तडीपार आदेशाचे उल्लंघन करून शहरात वावरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 तसेच आर्म्स अॅक्ट कलम 4/25 अन्वये नागपुरी गेट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे, सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास पुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके यांच्या नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली.

दरम्यान, तडीपार गुन्हेगार आणि शस्त्रांसह सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या समाजकंटकांविरोधात पोलिसांची मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. शहरातील शांतता आणि सुरक्षितता कायम राखण्यासाठी अशा प्रकारच्या कारवायांना अधिक गती दिली जाणार असल्याचेही सांगण्यात आले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button