AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावती पोलीस आयुक्तालयात महाराष्ट्र दिन उत्साहात; पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या हस्ते ध्वजारोहण

अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पोलीस बॅण्डच्या सुरेल वादनात राष्ट्रगीत आणि राज्यगीत सादर करण्यात आले, तर राष्ट्रध्वजाला सलामी देत मानवंदना देण्यात आली.

महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित या विशेष कार्यक्रमात पोलीस दलातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. पोलीस निरीक्षक निलेश गावंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर गुलसुंदरे, उपनिरीक्षक अजय मिश्रा, योगेश श्रीवास यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

यावेळी नुकतीच पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झालेल्या पोलीस अंमलदारांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच स्टुडंट पोलीस कॅडेट (SPC) योजनेअंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांनाही प्रशंसापत्र देऊन गौरविण्यात आले.

याशिवाय सन २०२५-२६ या कालावधीत विविध क्रीडा प्रकारात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करणारा हा सोहळा प्रेरणादायी ठरला.

या कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त शाम घुगे, गणेश शिंदे, रमेश धुमाळ यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमरावतीत महाराष्ट्र दिनानिमित्त पार पडलेल्या या कार्यक्रमातून पोलीस दलाच्या सेवाभावाचा गौरव करत देशसेवा, शिस्त आणि समर्पणाचा संदेश देण्यात आला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button