ब्राह्मणवाडा थडीत प्रतिबंधित गुटखा साठ्यावर पोलिसांचा छापा

₹5.32 लाखांचा गुटखा, पान मसाला आणि सुगंधी तंबाखू जप्त; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
चांदूर बाजार | प्रतिनिधी
अमरावती ग्रामीण पोलिसांनी अवैध गुटखा विक्री आणि साठवणुकीविरोधात मोठी कारवाई करत ब्राह्मणवाडा थडी येथील एका घरावर छापा टाकून शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला आणि सुगंधी तंबाखूचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत एकूण 5 लाख 32 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ब्राह्मणवाडा थडी पोलिसांना गुप्त माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार शारदापूरा, ब्राह्मणवाडा थडी येथे राहणारे मोहम्मद हाफिज सौदागर यांच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला.
झडतीदरम्यान घरात मोठ्या प्रमाणात शासनाने विक्रीस व साठवणुकीस बंदी घातलेला गुटखा, पान मसाला आणि विविध प्रकारची सुगंधी तंबाखू आढळून आली. पोलिसांनी तत्काळ हा संपूर्ण साठा जप्त करत पंचनामा केला.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये प्रिमियम पान मसाला, मास्टर ब्लेंडिंग पान मसाला, विमल पान मसाला, हॉट प्रिमियम पान मसाला, बाजीराव गोल्ड इम्पेरियल पान मसाला तसेच विविध ब्रँडच्या सुगंधी तंबाखूचा समावेश आहे. जप्त मालाची एकूण किंमत 5 लाख 32 हजार 420 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्राथमिक तपासादरम्यान या अवैध साठ्याप्रकरणी मोहम्मद मुतल्लीफ सौदागर, मोहम्मद हाफिज सौदागर, शेख अमीन, सय्यद जुनेद जब्बार आणि विक्रम उर्फ विक्की मंगलानी यांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी ब्राह्मणवाडा थडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 262/2026 नोंद करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध अन्न सुरक्षा आणि मानके कायदा तसेच इतर लागू कायद्यांनुसार कारवाई करण्यात येत आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
दरम्यान, प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात भविष्यातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा अमरावती ग्रामीण पोलिसांनी दिला आहे.



