धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते ध्वजारोहण

धुळे, दि. १ मे २०२६ — महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त धुळे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर, उपजिल्हाधिकारी संजय बागडे, चंद्रशेखर देशमुख, संदीप पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल सोनार, तहसीलदार प्रविण चव्हाणके यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या वतीने राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. यानंतर पोलीस दलाने संचलन सादर केले. तसेच पोलीस बॅण्ड पथकाने वंदे मातरम्, राष्ट्रगीत आणि राज्यगीताच्या सुरेल धून सादर करून वातावरणात देशभक्तीचा उत्साह निर्माण केला.
यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. राज्याच्या विकासात प्रशासन आणि कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगत त्यांनी सर्वांना कर्तव्यनिष्ठेने काम करण्याचे आवाहन केले.
देशभक्ती, शिस्त आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याने महाराष्ट्र दिनाचा अभिमान आणि राज्याच्या प्रगतीचा संकल्प अधिक दृढ केला.



