“जिवंत आहोत… पण मतदान यादीत नाही!” अड्याळमध्ये २०० हून अधिक मतदारांची नावे गायब; नागरिकांचा संताप

भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ गावातून लोकशाहीच्या पायालाच हादरा देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. ग्रामपंचायत पोटनिवडणुकीदरम्यान गावातील तब्बल २०० ते २५० जिवंत मतदारांची नावे मतदान यादीतून गायब झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मतदानासाठी केंद्रावर गेलेल्या अनेक नागरिकांना नाव नसल्याचे सांगण्यात आल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. या प्रकारामुळे अड्याळमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
अड्याळ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी गावातील नागरिक मोठ्या उत्साहाने मतदानासाठी केंद्रावर पोहोचले होते. मात्र, मतदान यादीत स्वतःचं नाव शोधताना अनेकांना धक्का बसला. अनेक जिवंत मतदारांची नावे यादीतून गायब असल्याचे समोर आले. त्यामुळे शेकडो नागरिकांना मतदान न करताच परत जावं लागलं.
या प्रकारामुळे संतप्त नागरिकांनी थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठत प्रशासनाला जाब विचारला. “मतदान हा आमचा घटनात्मक हक्क आहे… आणि तोच जर हिरावला जात असेल, तर ही लोकशाहीची थट्टा आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.
यावेळी एका संतप्त तरुणाने प्रशासनाला थेट सवाल करत म्हटलं, “जर आम्ही जिवंत असूनही आमची नावे यादीत नाहीत, तर आम्हाला मृत घोषित करा आणि मृत्यू दाखले द्या!” या वक्तव्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
नागरिकांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत म्हटलं की, मतदार जनजागृतीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मोहीमा राबवल्या जातात, पण प्रत्यक्षात जिवंत मतदारांची नावेच यादीत नसणे ही निवडणूक यंत्रणेची मोठी चूक आहे.
या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही केवळ तांत्रिक त्रुटी आहे की जाणीवपूर्वक हलगर्जीपणा, याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अड्याळमधील ही घटना केवळ एका गावापुरती मर्यादित नसून, ती संपूर्ण निवडणूक व्यवस्थेसाठी गंभीर इशारा मानली जात आहे. लोकशाहीचा सर्वात मूलभूत हक्क म्हणजे मतदान… आणि तोच जर जिवंत नागरिकांकडून हिरावला जात असेल, तर ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. आता प्रशासन या प्रकरणात काय कारवाई करतं, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



