AmravaticitynewsCrime NewsLatest NewsMaharashtraMaharashtraCrime

अमरावतीत मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

तीन आरोपी अटकेत; ८ लाख रुपयांच्या २१ दुचाकी जप्त, १७ गुन्ह्यांचा उलगडा

अमरावती | प्रतिनिधी

अमरावती शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांवर मोठा आळा घालत सिटी कोतवाली पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे ८ लाख रुपये किमतीच्या २१ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे अमरावती शहरासह विविध भागांतील एकूण १७ चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील बाजारपेठ परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या निर्देशानुसार विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली होती. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला.

तपासादरम्यान राहुल संतोष सोलंके (वय २४, रा. कारंजा लाड, जि. वाशीम), लखन उत्तमराव चौहान (वय २६) आणि महादेव उत्तमराव चौहान (वय २८, दोघेही रा. अळणगाव, ता. भातकुली, जि. अमरावती) यांना ताब्यात घेण्यात आले.

चौकशीदरम्यान आरोपींनी अमरावती शहरासह इतर भागांमध्ये दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे केल्याची माहिती दिली. त्यानंतर आरोपींच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून चोरीस गेलेल्या दुचाकी हस्तगत केल्या.

जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये होंडा युनिकॉर्न, स्प्लेंडर, स्प्लेंडर प्लस, होंडा शाईन, टीव्हीएस विक्टर तसेच ॲक्टिव्हा यांसारख्या लोकप्रिय दुचाकींचा समावेश आहे. एकूण २१ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्यांची अंदाजे किंमत ८ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिस तपासात या वाहनांचा संबंध अमरावती शहरातील ११ आणि इतर ठिकाणच्या ६ अशा एकूण १७ दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांशी असल्याचे निष्पन्न झाले आहे. याशिवाय आणखी चार दुचाकींबाबत पोलिसांचा तपास सुरू असून त्यांचा संबंध इतर गुन्ह्यांशी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सदर कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट, गुन्हे शाखा आणि डीबी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.

या कारवाईमुळे शहरातील दुचाकी चोरीच्या घटनांवर मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून नागरिकांनीही आपली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करावीत आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button