citynewsLatest NewsMaharashtraYavatmal

‘आत्मनिर्भर यवतमाळ’ घडविण्याचा संकल्प; महाराष्ट्र दिनी पालकमंत्री संजय राठोड यांचे विकासाचे व्हिजन

यवतमाळ जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ‘आत्मनिर्भर यवतमाळ’ घडविण्याचा संकल्प करूया, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त केले. ६७ वा महाराष्ट्र स्थापना दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा करताना त्यांनी कृषी, आरोग्य, शिक्षण, रोजगार, पायाभूत सुविधा आणि डिजिटल प्रशासन या क्षेत्रांतील विकासकामांचा आढावा घेत जिल्ह्याच्या प्रगतीचा रोडमॅप मांडला.

यवतमाळ येथील समता मैदानावर १ मे रोजी आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष ॲड. प्रियदर्शनी उईके, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, मुख्य वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, वीरमाता, वीर भगिनी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री राठोड म्हणाले की, यवतमाळ हा शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा जिल्हा असून, मागील काही वर्षांत कृषी, आरोग्य, शिक्षण, पर्यटन, तंत्रज्ञान आणि रोजगार क्षेत्रात जिल्ह्याने उल्लेखनीय प्रगती केली आहे. ‘विकसित भारत, विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनेला गती देण्यासाठी आता ‘आत्मनिर्भर यवतमाळ’ उभारणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांसाठी शासनाने विविध योजनांद्वारे मोठा आधार दिल्याचे सांगताना त्यांनी नमूद केले की, अवकाळी पावसामुळे फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या नुकसानीसाठी साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आतापर्यंत १ लाख ३० हजार शेतकऱ्यांना तब्बल १५०० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले असून, पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीतून २ लाख ९० हजार शेतकऱ्यांना ११६ कोटींचा लाभ देण्यात आला आहे.

जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाला सज्ज ठेवण्यात आले असून, सध्या प्रकल्पांमध्ये ४९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. ‘जलतारा’ संकल्पनेतून ३५०० शेत शोषखड्डे उभारले जात असून, जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत १३ हजारांहून अधिक कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी ९ हजारांहून अधिक कामे पूर्ण झाली असून १२७ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला गती देण्यात आली असून, जिल्ह्यातील ७० टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होत असल्याची माहिती त्यांनी दिली. मनरेगा आणि भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेतून २६०० शेतकऱ्यांनी २७०० हेक्टरवर फळबागांची लागवड केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ‘मिशन उभारी’ उपक्रमांतर्गत ७०० हून अधिक संकटग्रस्त कुटुंबांना मानसिक आणि आर्थिक आधार देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. तर उद्योगांना चालना देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत ६५६ कर्ज प्रकरणांना मंजुरी देण्यात आली असून, २८२ सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना २२ कोटींचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.

नेर तालुक्यातील उत्तरवाढोणा येथे रिलायन्सचा बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची घोषणा करत त्यांनी आत्मनिर्भर भारत संकल्पनेत यवतमाळही पुढे जात असल्याचे सांगितले.

आरोग्य क्षेत्रात आयुष्मान भारत योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १ लाख रुग्णांनी लाभ घेतला असून, ४८० कोटी रुपये रुग्णालयांना वितरित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतूनही २ कोटी ३८ लाखांची मदत रुग्णांना देण्यात आली आहे.

शिक्षण क्षेत्रात जिल्ह्यातील २०० शाळांचे डिजिटायझेशन करण्यात आले असून, डिजिटल स्कूल, स्मार्ट क्लासरूम आणि अभ्यासिका उभारून विद्यार्थ्यांना खाजगी शाळांसारखे दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

पायाभूत सुविधांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, जिल्ह्यात रस्ते विकास आणि पायाभूत सुविधांसाठी ५ हजार कोटी रुपयांहून अधिक कामे सुरू आहेत. यापैकी ५१० कामे पूर्ण झाली असून ८०७ कामे प्रगतीपथावर आहेत.

पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी अत्याधुनिक वाहने देण्यात आली असून, बहुतांश तालुक्यांत सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. लोहारा पोलीस स्टेशन हद्दीत १००० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी ४.९५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहितीही त्यांनी दिली.

पालकमंत्री संजय राठोड यांच्या भाषणातून यवतमाळ जिल्ह्याच्या विकासाचा व्यापक आराखडा समोर आला. कृषीपासून उद्योगापर्यंत, शिक्षणापासून डिजिटल प्रशासनापर्यंत आणि आरोग्यापासून कायदा-सुव्यवस्थेपर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्याचा निर्धार यवतमाळ जिल्ह्याने महाराष्ट्र दिनी पुन्हा एकदा व्यक्त केला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button