नागपुरात शाळकरी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; धमकावून वारंवार शोषण, आरोपी अटकेत

विद्येचं माहेरघर आणि उपराजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरातून माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. नंदनवन परिसरात एका शाळकरी अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पीडित मुलीच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत आरोपीने या चिमुरडीला गप्प राहण्यास भाग पाडल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणातील आरोपीचे नाव हर्षद युवराज नारनवरे (वय २४) असे असून, नंदनवन पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी शाळेत ये-जा करत असताना आरोपी हर्षद नारनवरे तिचा सतत पाठलाग करत होता. सुरुवातीला पाठलाग आणि धमकावणे इतपत सुरू असलेला हा प्रकार नंतर गंभीर स्वरूपात बदलला. आरोपीने पीडित मुलीच्या वडिलांना ठार मारण्याची धमकी देत तिला गप्प राहण्यास भाग पाडले.
या भीतीचा गैरफायदा घेत आरोपीने पीडित मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. भीतीपोटी मुलगी बराच काळ गप्प राहिली. मात्र काही दिवसांनी तिच्या प्रकृतीत बदल जाणवू लागल्याने कुटुंबीयांना संशय आला.
कुटुंबीयांनी वैद्यकीय तपासणी केली असता पीडित मुलगी गर्भवती असल्याचे धक्कादायक सत्य समोर आले. ही माहिती समोर येताच कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली आणि तातडीने नंदनवन पोलिस ठाण्यात धाव घेण्यात आली.
या घटनेमुळे नंदनवन परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. पण प्रश्न उरतो तो सुरक्षिततेचा! आपल्या मुली सुरक्षित आहेत का? पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



