AmravaticitynewsCrime NewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत अट्टल दुचाकी चोर जेरबंद; गाडगेनगर पोलिसांची कारवाई, चोरीची मोटरसायकल जप्त

अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत अट्टल मोटरसायकल चोरावर डि.बी. पथकाने मोठी कारवाई करत चोरीची मोटरसायकल जप्त केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा माग काढत पोलिसांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

फिर्यादी प्रविण राजेंद्र इंगळे (वय ३२, रा. नारायणपूर, ता. अचलपूर) यांची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल १७ मार्च २०२६ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या पार्किंगमधून चोरीला गेली होती. याप्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९१/२०२६ नोंदविण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या तपासातून आरोपी गौरव विठ्ठल ढोणे (वय ३०, रा. म्हैसपूर, ता. दर्यापूर) याची ओळख पटली.

पोलिसांनी संशयित गौरव ढोणे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीने चोरीची मोटरसायकल शिंगणवाडी येथील शेतात बनावट नंबर प्लेट लावून लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना दिली.

यानंतर गाडगेनगर डि.बी. पथकाने पंचांसमक्ष घटनास्थळी जाऊन शिंगणवाडी येथून चोरीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल जप्त केली. आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी वाहनावर बनावट नंबर प्लेट लावल्याचेही तपासात उघड झाले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपआयुक्त गणेश शिंदे आणि सहायक पोलीस आयुक्त शिवाजीराव बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

गाडगेनगर डि.बी. पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सागर ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कारवाई करत आरोपीला जेरबंद केले. या कारवाईमुळे शहरातील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अमरावतीत वाढत्या वाहनचोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गाडगेनगर पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून, आरोपीकडून आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button