citynewsIndia NewsLatest News

गुजरातमध्ये भीषण अपघात; भरधाव बसची व्हॅनला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू

गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यात बुधवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. भरधाव खासगी बसने प्रवासी व्हॅनला मागून जोरदार धडक दिल्याने सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ही दुर्घटना साबरकांठा जिल्ह्यातील महामार्गावर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी भरलेली व्हॅन श्यामळाजीहून हिम्मतनगरकडे जात होती. याच दरम्यान, भरधाव वेगात येणाऱ्या एका खासगी बसने व्हॅनला मागून जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की व्हॅनचा चक्काचूर झाला आणि त्यातील सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

घटनेची माहिती मिळताच गांभोई पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य राबवत जखमींना बाहेर काढले आणि रुग्णालयात हलवले.

प्राथमिक तपासात बसचा वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

या भीषण अपघातामुळे गुजरातमध्ये शोककळा पसरली असून, महामार्गावरील बेदरकार वेग पुन्हा एकदा जीवघेणा ठरत असल्याचे या घटनेतून समोर आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button