नागपूरात ‘चमत्कार’ विरुद्ध ‘विज्ञान’ आमनेसामने; धिरेंद्र शास्त्री–श्याम मानव वादाने घेतला उग्र वळण

नागपूरमध्ये सध्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. बागेश्वर धामचे धिरेंद्र कृष्ण शास्त्री आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांच्यातील वाद आता उघड आव्हानांपर्यंत पोहोचला असून, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर हा वाद अधिकच तापला आहे. नागपूरच्या रेशीमबाग परिसरात या घडामोडींमुळे वातावरण चांगलेच तापले आहे.
नागपूरमध्ये सुरू असलेल्या रामकथा कार्यक्रमादरम्यान धिरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांना थेट खुलं आव्हान दिलं. रेशीमबाग येथील कार्यक्रमात बोलताना शास्त्री म्हणाले, “मी पाच दिवस इथे आहे, मध्य प्रदेशात नाही. रामकथा सुरू आहे, मंच त्यांचा आहे. कुणाला काही शंका असेल तर त्यांनी यावं. दोन दिवस दरबार लागणार आहे.”
यावेळी त्यांनी आपल्या कथित शक्तींवरही भाष्य करत सांगितले, “माझ्याकडे जी विद्या आणि शक्ती आहे, तिचे मी प्रदर्शन करणार आहे. मी जादूगार नाही, ईश्वराची प्रेरणा मिळते म्हणून लोकांना मार्गदर्शन करतो.” तसेच त्यांनी टीकाकारांना उद्देशून स्पष्ट इशारा देत म्हटले, “३० तारखेला मी निघून जाणार, मग कोणी म्हणू नये की बाबा पळून गेला.”
धिरेंद्र शास्त्रींच्या या खुल्या आव्हानाला उत्तर देताना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी सांगितले की, समितीने यापूर्वी जाहीर केलेले ३० लाखांचे बक्षीस आता वाढवून ८० लाख रुपये केले आहे. “जर धिरेंद्र शास्त्री यांनी खरोखरच चमत्कार सिद्ध केला, तर ही रक्कम त्यांना दिली जाईल,” असे श्याम मानव यांनी स्पष्ट केले.
श्याम मानव यांनी आव्हान अधिक ठोस करत म्हटले की, “दिव्य दरबारात दाखवलेले व्हिडिओ पाहता, त्यांनी पत्रकारांसमोर दहा लोकांची अचूक माहिती सांगावी किंवा बंद खोलीत ठेवलेल्या वस्तू ओळखाव्यात.” त्यांनी कठोर आरोप करत म्हटले, “बाबांकडे कोणतीही दिव्य शक्ती नाही. ते लोकांची दिशाभूल करत आहेत. जर त्यांनी ९० टक्के गोष्टी अचूक ओळखल्या, तर आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती बंद करून त्यांचे भक्त होऊ.”
या सगळ्या घडामोडींमुळे नागपूरमध्ये श्रद्धा विरुद्ध विज्ञान, विश्वास विरुद्ध तर्क आणि चमत्कार विरुद्ध परीक्षण असा मोठा वैचारिक संघर्ष रंगला आहे. सोशल मीडियावर या वादाची जोरदार चर्चा सुरू असून, नागरिकांचे लक्ष आता या प्रत्यक्ष ‘चॅलेंज’कडे लागले आहे.
नागपूरमध्ये श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या सीमारेषेवर उभा असलेला हा वाद आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. धिरेंद्र शास्त्री आणि श्याम मानव यांच्यातील हे उघड आव्हान प्रत्यक्षात येणार का, आणि त्यातून नेमकं काय निष्पन्न होणार, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



