अमरावतीत 13 लाखांच्या सोयाबीन घोटाळ्याचा पर्दाफाश; दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या

बनावट नंबर प्लेट, खोटे नाव आणि मोबाईल क्रमांकाच्या आधारे फसवणूक; गाडगेनगर पोलिसांनी जप्त केला 20 लाखांचा मुद्देमाल
अमरावती प्रतिनिधी
अमरावतीतील एका अडद व्यापाऱ्याची तब्बल 13 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या ट्रक चालकाचा पर्दाफाश करण्यात गाडगेनगर पोलिसांना मोठे यश आले आहे. खोटे नाव, बनावट मोबाईल क्रमांक आणि ट्रकवर बनावट नंबर प्लेट लावून आरोपींनी सोयाबीनचा माल परस्पर विकून फसवणूक केली होती. मात्र सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या क्लिष्ट गुन्ह्याचा छडा लावत 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावतीतील धान्य व्यापारी मनीष सतीश भट्टड यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीतून 201 क्विंटल सोयाबीन खरेदी करून तो सोलापूर येथील एका व्यापाऱ्याला विकला होता. हा माल सोलापूर येथे पोहोचवण्यासाठी बाबा ट्रान्सपोर्टमार्फत ट्रक क्रमांक एमएच-25-यू-0375 ने रवाना करण्यात आला होता.
मात्र काही दिवस उलटूनही माल सोलापूरला पोहोचला नाही. यानंतर व्यापाऱ्याने चौकशी केली असता ट्रक चालकाने विश्वासघात करून अंदाजे 13 लाख रुपयांच्या सोयाबीनची परस्पर विल्हेवाट लावल्याचे समोर आले. याप्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान ट्रकचा नोंदणी क्रमांक बनावट असल्याचे आणि चालकाने दिलेले नाव तसेच मोबाईल क्रमांकही खोटे असल्याचे उघड झाले.
त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील तसेच विविध टोलनाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी नांदेड जिल्ह्यातील शिवाजी त्र्यंबक राठोड आणि ट्रक मालक रमेश मिठ्ठू राठोड यांच्यापर्यंत तपासाची सूत्रे पोहोचवली.
रमेश राठोड याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने शिवाजी राठोडसोबत संगनमत करून ट्रकवर बनावट नंबर प्लेट लावून फसवणूक केल्याची कबुली दिली. आरोपींनी परभणी जिल्ह्यातील फरकांडा येथे सोयाबीनची विक्री केल्याचेही तपासात समोर आले.
या प्रकरणात पोलिसांनी व्यवहारातून मिळालेली 12 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेला मूळ ट्रकही ताब्यात घेतला. एकूण सुमारे 20 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
खोटे नाव, बनावट नंबर प्लेट आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आलेल्या या फसवणुकीचा गाडगेनगर पोलिसांनी अल्पावधीत उलगडा केला आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि प्रभावी पोलिसी कामगिरीमुळे आरोपींपर्यंत पोहोचत हा गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले.
या कारवाईमुळे व्यापारी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत असून पोलिसांच्या तपास कौशल्याचे कौतुक होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गाडगेनगर पोलीस करीत आहेत.



