citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur graminNagpurCrimeNagpurPolice

“ऑपरेशन थंडर”ची मोठी कारवाई; नागपुरात चार किलोहून अधिक गांजासह दोघे जेरबंद

कळमना पोलिसांचा छापा; अॅक्टिव्हासह १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर प्रतिनिधी

नागपूर शहर पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात सुरू केलेल्या “ऑपरेशन थंडर” अंतर्गत मोठी कारवाई करत चार किलोहून अधिक गांजा जप्त केला आहे. कळमना पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकून दोन आरोपींना अटक केली असून या कारवाईत दुचाकीसह एकूण १ लाख ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नागपूर शहरात अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी पोलीस विभागाने “ऑपरेशन थंडर” मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत विविध भागांमध्ये विशेष तपास आणि कारवाया सुरू असून कळमना पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार प्रमोद कंगाले हे आपल्या पथकासह नियमित पेट्रोलिंग करत असताना त्यांना कळमना मार्केट परिसरातील चिखली गेटजवळ दोन संशयित व्यक्ती दुचाकीसह उभ्या असल्याची माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. एनडीपीएस कायद्यानुसार आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून दोन पंचांच्या उपस्थितीत संशयितांची तपासणी करण्यात आली. यावेळी आरोपींकडून ४ किलो १६८ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला.

या प्रकरणात सोम महेश बेडिया आणि असीम खान जमील खान या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपी मध्य प्रदेशातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कारवाईदरम्यान पोलिसांनी अंदाजे ८० हजार रुपये किमतीचा गांजा, ५० हजार रुपये किमतीची होंडा अॅक्टिव्हा दुचाकी तसेच एक कॉलेज बॅग असा एकूण १ लाख ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी कळमना पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींकडून गांजा कुठून आणला गेला आणि तो कुठे विक्रीसाठी नेण्यात येणार होता, याचा तपास पोलीस करीत आहेत.

दरम्यान, नागपूर शहर पोलिसांच्या “ऑपरेशन थंडर” मोहिमेमुळे अमली पदार्थ तस्करांमध्ये खळबळ उडाली असून अशा कारवायांमुळे शहरातील अवैध अमली पदार्थांच्या व्यापाराला मोठा धक्का बसणार असल्याचे मानले जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button