citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

नागपुरात चेन स्नॅचरला बेड्या; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणारा आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात; अॅक्टिव्हा, मोबाईलसह मुद्देमाल हस्तगत

नागपूर प्रतिनिधी

नागपूर शहरात दिवसाढवळ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून पसार होणाऱ्या चेन स्नॅचर्सविरोधात गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. सिताबर्डी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखेच्या सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून तब्बल ३ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ९ जून २०२६ रोजी धरमपेठ परिसरात दुपारच्या सुमारास ही घटना घडली होती. रक्त तपासणी करून घरी परतणाऱ्या ७८ वर्षीय विजयालक्ष्मी सुर्यनारायण नेरे या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन एका दुचाकीस्वाराने हिसकावून नेली होती. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती.

याप्रकरणी सिताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेच्या सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने तात्काळ तपास सुरू केला. गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी मनोज प्रभू बुरडे (वय ३८), रा. लालगंज, झाडे चौक, शांतीनगर या आरोपीला ताब्यात घेतले.

पोलीस चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी पंचासमक्ष त्याच्याकडून चोरीतील मुद्देमाल जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये सुमारे २० ग्रॅम वजनाची अंदाजे अडीच लाख रुपये किंमतीची सोन्याची चैन, २० हजार रुपये किंमतीचा वन प्लस मोबाईल, ८५ हजार रुपये किंमतीची अॅक्टिव्हा दुचाकी तसेच हेल्मेटचा समावेश आहे. एकूण ३ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

ही कारवाई गुन्हे शाखेच्या सोनसाखळी चोरी विरोधी पथकाच्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगला हरडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस कर्मचारी प्रफुल मानकर, मनीष बुरडे, संतोष गुप्ता, संदीप भोकरे आणि कुणाल लांडगे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद रेड्डी, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, पोलीस उपायुक्त दीपक अग्रवाल आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई पार पडली.

या कारवाईमुळे नागपूर शहरातील चेन स्नॅचिंगच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना सतर्कता बाळगावी आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button