मुंबईच्या मरीन ड्राइव्हवर भरधाव दुचाकीचा कहर; ज्येष्ठ मॉर्निंग वॉकरसह तिघांचा जागीच मृत्यू

मुंबईच्या मरीन ड्राइव्हवर सोमवारी पहाटे भीषण अपघातात दोन तरुण आणि एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. भरधाव वेगाने धावणाऱ्या दुचाकीने मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की तिघांचाही जागीच मृत्यू झाला.
हा भीषण अपघात सोमवारी पहाटे सुमारे ५.४० वाजता मरीन ड्राइव्हवरील एन. एस. रोड, पारशी जिमखाना सिग्नलजवळ घडला. पोलिसांच्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेली दुचाकी उत्तरेकडील मार्गाने जात होती. त्यावेळी रस्ता ओलांडत असलेल्या किशोर लमाणे (वय ६६, रा. गिरगाव) यांना दुचाकीने जोरदार धडक दिली. धडकेनंतर लमाणे यांचा मृतदेह अपघातस्थळापासून १०० फूटांहून अधिक अंतरावर फेकला गेला.
या अपघातात दुचाकीस्वार कृष्णा देसाई (वय १९, रा. मुलुंड) आणि मागे बसलेली मुस्कान शेख (वय १८, रा. गीता नगर, कफ परेड) यांचाही मृत्यू झाला. अपघातानंतर मुस्कानचा मृतदेह सुमारे ३० फूट अंतरावर उभ्या कारखाली आढळला, तर कृष्णाचा मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेल्या दुसऱ्या दुचाकीजवळ सापडला.
घटनेनंतर स्थानिकांच्या मदतीने तिघांनाही तातडीने जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती तिघांनाही मृत घोषित केले. पोलिसांच्या प्राथमिक तपासात दुचाकीचा वेग जास्त असल्याचे आणि सिग्नल तोडल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मृत किशोर लमाणे हे फोर्ट येथील खासगी कंपनीत लेखापाल म्हणून कार्यरत होते आणि निवृत्तीनंतर दररोजप्रमाणे सकाळच्या फेरफटक्यासाठी घराबाहेर पडले होते. दरम्यान, कृष्णा देसाईचा रविवारी वाढदिवस होता आणि तो रात्री घराबाहेर गेला होता, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.
या घटनेनंतर मरीन ड्राइव्ह पोलिसांनी निष्काळजीपणे वाहन चालवणे, वेगमर्यादा भंग करणे आणि मृत्यूस कारणीभूत ठरणे यासह विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या भीषण अपघातामुळे मुंबईत पुन्हा एकदा भरधाव वेग आणि बेफाम वाहनचालकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.



