नाशिकमध्ये धक्कादायक अपघात; मेडिकल कॉलेजमधील लिफ्टमध्ये डोकं अडकल्याने महिला कर्मचाऱी गंभीर जखमी

नाशिकमधील एका वैद्यकीय महाविद्यालयात अत्यंत धक्कादायक अपघात घडला आहे. शस्त्रक्रिया विभागात काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱीचे डोके मालवाहू लिफ्टमध्ये अडकून त्या गंभीर जखमी झाल्या. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून रुग्णालय प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ज्योती शिवाजी अहिरे (वय ५०) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या नाशिकमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या. सोमवारी त्या शस्त्रक्रियेसाठी वापरले जाणारे साहित्य ने-आण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या छोट्या मालवाहू लिफ्टजवळ काम करत होत्या. त्यावेळी त्या लिफ्टमध्ये वाकून पाहत असतानाच लिफ्ट अचानक सुरू झाली आणि त्यात त्यांचे डोके अडकले.
अपघात इतका भीषण होता की ज्योती अहिरे गंभीर जखमी झाल्या. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा संपूर्ण प्रकार स्पष्टपणे दिसत असून, त्यांच्या शेजारील दुसऱ्या कर्मचाऱ्याने तातडीने ही घटना लक्षात घेऊन इतरांना मदतीसाठी बोलावल्याचे दिसते. काही क्षणांतच इतर कर्मचारी घटनास्थळी धावून आले आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र सुरुवातीला त्यांचे डोके लिफ्टमधून बाहेर काढणे शक्य झाले नाही.
त्यानंतर मोठ्या प्रयत्नांनी त्यांची सुटका करण्यात आली आणि त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर रुग्णालयातील सुरक्षा उपाययोजना, लिफ्टची तांत्रिक तपासणी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. वैद्यकीय संस्थांसारख्या संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारचा निष्काळजीपणा अत्यंत धोकादायक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली असून लिफ्टच्या तांत्रिक बिघाडासह मानवी निष्काळजीपणाचाही तपास केला जात आहे.



