बडनेऱ्यात सार्वजनिक शौचालयांची दयनीय अवस्था; मनपाच्या स्वच्छतेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

अमरावती महानगरपालिकेच्या स्वच्छतेच्या दाव्यांना बडनेरा प्रभाग क्रमांक २२ मधील सार्वजनिक शौचालयांच्या दयनीय अवस्थेमुळे मोठा धक्का बसला आहे. अस्वच्छता, दुर्गंधी, तुटलेली सुविधा आणि देखभालीअभावी नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर संकट निर्माण झाले असून परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अमरावती महानगरपालिका झोन क्रमांक ४ अंतर्गत येणाऱ्या बडनेरा प्रभाग क्रमांक २२ मधील यवमाळ रोड परिसरातील अशोक नगर, हमालपुरा, इंदिरा नगर, आदिवासी नगर, पंचशील नगर आणि गवळीपुरा येथील सार्वजनिक शौचालयांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. अनेक दिवसांपासून या शौचालयांची नियमित साफसफाई न झाल्याने परिसरात सर्वत्र घाण, दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक शौचालयांमध्ये पाण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित असून, स्वच्छतेचा पूर्णपणे अभाव आहे. अनेक शौचालयांचे दरवाजे तुटलेले आहेत, गटारे तुंबलेली आहेत, तर काही ठिकाणी घाणीचे ढीग साचल्यामुळे शौचालयांचा वापर करणेही धोकादायक बनले आहे.
या गंभीर परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली असून, काही ठिकाणी ही सार्वजनिक शौचालये पाडून त्या जागेचा समाजोपयोगी कामांसाठी वापर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नागरिकांनी या ठिकाणी अंगणवाडी, अभ्यासिका, व्यायामशाळा किंवा लहान मुलांसाठी खेळाचे मैदान उभारण्याचे पर्यायही प्रशासनासमोर मांडले आहेत.
स्वच्छ भारत मिशन आणि हागणदारीमुक्त शहराचे दावे करणाऱ्या महापालिका प्रशासनावर या परिस्थितीमुळे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कागदोपत्री स्वच्छतेचे दावे आणि प्रत्यक्षात नागरिकांना भेडसावणारी अस्वच्छता यातील तफावत पुन्हा एकदा समोर आली आहे.
सार्वजनिक आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष देणे अत्यावश्यक आहे. नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित पाहणी करून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी ठाम मागणी केली आहे. अन्यथा नागरिकांचा संताप तीव्र आंदोलनात बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.



