Uncategorized

‘जनसेवा दिवस’ निमित्त बडनेऱ्यात भव्य स्वच्छता अभियान; आमदार रवी राणा यांच्या वाढदिवशी समाजसेवेचा आदर्श

लोकप्रतिनिधींचा वाढदिवस केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता समाजसेवेची संधी म्हणून साजरा करता येतो, याचं प्रेरणादायी उदाहरण अमरावतीत पाहायला मिळालं. बडनेरा विधानसभा मतदारसंघात आमदार रवी राणा यांच्या वाढदिवसानिमित्त ‘जनसेवा दिवस’ साजरा करत भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

बडनेरा वरुडा येथील बौद्ध स्मशानभूमीत आमदार रवी राणा यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्वाभिमानी पक्षाच्या नगरसेवकांसह शेकडो महिला-पुरुष कार्यकर्त्यांनी एकत्र येत स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबविली.

प्रभाग क्रमांक २२ चे नगरसेवक अजय जैस्वाल, किशोर जाधव, रजनी डोंगरे आणि गौरी मेघवानी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी स्मशानभूमी परिसरातील वाढलेली जंगली झाडेझुडपे हटवून संपूर्ण परिसर स्वच्छ केला. स्मशानभूमीत वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडे कापण्यात आली.

यावेळी महिला कार्यकर्त्यांनी झाडू मारून परिसराची स्वच्छता केली, तर इतर कार्यकर्त्यांनी परिसरातील कचरा हटवून स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण निर्माण केले. या उपक्रमामुळे स्मशानभूमीत येणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यावेळी नगरसेवकांनी सांगितले की, वाढदिवस साजरा करण्याचा खरा अर्थ म्हणजे समाजासाठी सकारात्मक काम करणे. स्वच्छता हीच खरी सेवा असून नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही कायम तत्पर राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत कार्यकर्त्यांचे कौतुक केले. ‘जनसेवा दिवस’ निमित्त राबविण्यात आलेल्या या स्वच्छता अभियानाने सामाजिक बांधिलकी आणि जनसेवेचा आदर्श निर्माण केला आहे.

स्वच्छता, सेवा आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संदेश देणारा हा उपक्रम समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत असून, अशाच लोकाभिमुख कामांमुळे लोकप्रतिनिधींवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसून आले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button