बडनेरा–यवतमाळ रोडवर ‘मृत्यूचा खड्डा’; प्रशासनाच्या निष्काळजीपणाने नागरिकांचा जीव धोक्यात

अमरावतीत प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. बडनेरा–यवतमाळ रोडवरील यवतमाळ टी-पॉइंट परिसरात सर्व्हिस लाईन दुरुस्तीच्या नावाखाली खोदण्यात आलेला सुमारे सहा फूट खोल खड्डा उघड्यावरच सोडण्यात आल्याने नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.
बडनेरा–यवतमाळ रस्त्यालगतच्या अत्यंत वर्दळीच्या यवतमाळ टी-पॉइंट परिसरात प्रशासनाने सर्व्हिस लाईन दुरुस्तीचे काम सुरू केले. मात्र कामानंतर सुमारे सहा फूट खोल खड्डा तसाच उघडा ठेवण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बॅरिकेड्स उभारण्यात आलेले नाहीत, इशारा देणारे फलक लावलेले नाहीत, तसेच रात्री वाहनचालकांना धोका लक्षात यावा यासाठी रेडियम, ब्लिंकर किंवा प्रकाशव्यवस्थाही करण्यात आलेली नाही.
हा मार्ग शहरातील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक मानला जातो. दिवसभर हजारो लहान-मोठी वाहने या मार्गावरून प्रवास करतात. अशा परिस्थितीत उघड्यावर सोडलेला हा खोल खड्डा अपघाताला थेट निमंत्रण देत असल्याचे चित्र आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांना खड्ड्याचा अंदाज न आल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. “एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. विकासकामांच्या नावाखाली नागरिकांच्या सुरक्षिततेकडे होत असलेले दुर्लक्ष हा गंभीर निष्काळजीपणाचाच प्रकार असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
नागरिकांनी तातडीने हा खड्डा बुजवून परिसरात आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. अन्यथा प्रशासनाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.
एकीकडे विकासाच्या घोषणा आणि दुसरीकडे नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला हा निष्काळजी खेळ प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे. एखादी दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने तातडीने जागे होणे, हीच नागरिकांची आता सर्वात मोठी अपेक्षा आहे.



