AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

NCERT च्या इतिहास पुस्तकातील बदलावरून महाराष्ट्रात संताप; १ मे रोजी सांगलीत ‘हिंदवी स्वराज्य सन्मान महामोर्चा’

NCERT च्या इतिहास पुस्तकातील बदलावरून महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. इयत्ता आठवीच्या इतिहास पुस्तकातून मराठा साम्राज्याचा १७५९ मधील नकाशा वगळल्याच्या निर्णयाविरोधात १ मे रोजी सांगली येथे ‘हिंदवी स्वराज्य सन्मान महामोर्चा’ काढण्यात येणार असून, या मोर्चात मोठ्या प्रमाणावर जनसहभाग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या ‘हिंदवी स्वराज्य’ मोहिमेला यंदा अधिक आक्रमक स्वरूप प्राप्त झाले आहे. पानीपत, सुरत, गोवळकोंडा आणि गोमतक (गोवा) यांसारख्या ऐतिहासिक स्थळांवर मोहिमा राबवत मराठा साम्राज्याचा इतिहास जनतेपर्यंत पोहोचवणाऱ्या या संघटनेने आता थेट शिक्षण व्यवस्थेतील इतिहास मांडणीवर सवाल उपस्थित केला आहे.

वादाचा केंद्रबिंदू ठरला आहे NCERT च्या “Exploring Society: India and Beyond” या पुस्तकातील मराठा साम्राज्याच्या १७५९ च्या नकाश्याचा वगळलेला संदर्भ. NCERT ने हा नकाशा वादानंतर काढून टाकल्याचे समोर आले असून, राजस्थानातील काही इतिहासकार, राजघराणी आणि संघटनांनी ऐतिहासिक अचूकतेबाबत आक्षेप घेतल्यानंतर हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रातील इतिहास अभ्यासक आणि मराठा संघटनांचा आरोप आहे की, हा निर्णय मनमानी, इतिहासविरोधी आणि विद्यार्थ्यांच्या माहितीच्या अधिकारावर गदा आणणारा आहे. त्यांच्या मते, इ.स. १७५० ते १७६० या काळात मराठा साम्राज्याने उत्तर भारतात प्रभावी वर्चस्व प्रस्थापित केले होते. दिल्ली, मालवा, बुंदेलखंड, पंजाब आणि अटकेपारपर्यंत मराठ्यांचा प्रभाव होता, असे ऐतिहासिक पुरावे सांगतात. पेशवे दप्तर, तह, महसूल नोंदी आणि गॅझेटियर यांचा दाखला देत या नकाश्याची पुनर्स्थापना करण्याची मागणी होत आहे.

या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांनी काही ठोस मागण्या पुढे केल्या आहेत. त्यामध्ये १७५९ चा नकाशा तात्काळ पुनर्स्थापित करणे, स्वतंत्र इतिहास तज्ज्ञ समिती स्थापन करणे, सर्व अभ्यासक्रम बदलांची कारणमीमांसा सार्वजनिक करणे, अभ्यासक्रमात पारदर्शकता राखणे आणि केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करणे या मागण्यांचा समावेश आहे.

१ मे रोजी सांगली येथे होणाऱ्या या महामोर्चात उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे यांच्यासह इतिहास अभ्यासक, मराठा संघटनांचे पदाधिकारी आणि मराठा सरदारांचे वंशज सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा आणि न्यायालयीन लढाही उभारण्याचा इशारा आयोजकांनी दिला आहे.

इतिहासाच्या अभ्यासक्रमावरून सुरू झालेला हा वाद आता रस्त्यावर उतरला आहे. १ मे रोजी सांगलीत होणारा ‘हिंदवी स्वराज्य सन्मान महामोर्चा’ हा केवळ इतिहासाचा मुद्दा राहिलेला नसून तो अस्मिता, अभ्यासक्रम आणि ऐतिहासिक ओळखीच्या लढाईत रूपांतरित होताना दिसत आहे. राज्याच्या राजकारणावर आणि शिक्षण व्यवस्थेवर या आंदोलनाचा किती परिणाम होतो, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button