Uncategorized

चालकाला झोप लागली अन् एका महिलेने जीव गमावला

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात आज दुपारी एक भीषण अपघात घडला आहे. नागपूर-काटोल मार्गावर डोरली गावाजवळ मालवाहू वाहन डिव्हायडरला धडकून झालेल्या या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


रविवारी दुपारी नागपूर येथील शाहू कुटुंब सती अनसूया माता मंदिर, पारडसिंगा येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून परत नागपूरकडे येत असताना डोरली शिवाराजवळ चालकाला अचानक झोप लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित झालेलं वाहन थेट रस्त्याच्या डिव्हायडरला जाऊन धडकले. या भीषण अपघातात विमलाबाई रामस्वरूप शाहू (५५) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर पूनम शाहू, रामस्वरूप शाहू, माही शाहू, मंजू शाहू, सृष्टी महेशकर, आरोही महेशकर, आशीष शाहू, मयंक शाहू आणि पीयूष शाहू हे गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोज कालबांडे यांनी तात्काळ पोलीस पथक घटनास्थळी पाठवले. सर्व जखमींना प्रथम कळमेश्वर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर प्राथमिक उपचारानंतर त्यांना नागपूरच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार वाहनाचा वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय प्रशांत खोब्रागडे करीत आहेत.


दरम्यान, या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वेग आणि चालकाची निष्काळजीपणा यामुळे पुन्हा एकदा जीवितहानी झाली आहे. वाहन चालवताना सतर्कता आणि विश्रांती किती महत्त्वाची आहे, याची ही घटना गंभीर आठवण करून देते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button