Uncategorized

अमरावतीत भोंदूबाबांचा घातक सापळा; महिलेवर अत्याचार, दोघांना अटक

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरात भोंदूगिरीच्या नावाखाली महिलेची फसवणूक आणि अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तुटलेले लग्न पुन्हा जुळवून देण्याचे आमिष दाखवत 35 वर्षीय महिलेची फसवणूक करण्यात आली आणि तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

रियाजोद्दीन, वय 45, आणि वसीम, वय 32, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडित महिलेचे वर्षभरापूर्वी लग्न तुटले होते. काही दिवसांपूर्वी तिची ओळख रियाजोद्दीनशी झाली. त्याने महिलेची परिस्थिती जाणून घेत तिचा विश्वास संपादन केला.

यानंतर, वसीम नावाच्या व्यक्तीकडून विशेष पूजा केल्यास तुटलेले लग्न पुन्हा जुळेल, असा बनाव करत महिलेला त्याच्याकडे पाठवण्यात आले. वसीमने पूजेच्या नावाखाली महिलेची 25 ते 30 हजार रुपयांची फसवणूक केली.

दरम्यान, रियाजोद्दीनने महिलेच्या एकटेपणाचा फायदा घेत तिच्या घरी ये-जा वाढवली आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

अखेर त्रास असह्य झाल्याने पीडित महिलेने नांदगाव पेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बलात्कार आणि जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा नोंदवून दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

अशा प्रकारच्या भोंदूगिरीच्या घटनांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button