Uncategorized

अमरावतीत घाणेरडी शौचालये! स्वच्छ अमरावती फक्त कागदावर?


अमरावती शहरात स्वच्छतेच्या दाव्यांना तडा जात असल्याचं चित्र समोर आलं आहे. महानगरपालिकेच्या झोन क्रमांक ४ अंतर्गत बडनेरा प्रभाग क्रमांक २२ मधील सार्वजनिक शौचालयांची अवस्था इतकी बिकट झाली आहे की नागरिकांच्या आरोग्यावर थेट परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नेमकी परिस्थिती काय आहे, पाहूया


अमरावती महानगरपालिका झोन क्रमांक ४ अंतर्गत बडनेरा प्रभाग क्रमांक २२ मधील अशोक नगर, यवतमाळ रोड, मिलचाळ आणि आठवडी बाजार परिसरात सार्वजनिक शौचालयांची दयनीय अवस्था उघड झाली आहे. महिनोनमहिने साफसफाई न झाल्याने या ठिकाणी घाणीचे ढीग साचले असून तीव्र दुर्गंधी पसरली आहे. अनेक शौचालयांमध्ये पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही, तर काही ठिकाणी वीजही उपलब्ध नाही. दरवाजे तुटलेले, गटारे तुंबलेली आणि सर्वत्र अस्वच्छता – अशी भयावह परिस्थिती नागरिकांना रोज अनुभवावी लागत आहे.

या शौचालयांचा वापर करणे नागरिकांसाठी धोकादायक ठरत असून आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. विशेष म्हणजे, या परिसरातील बहुतांश घरांमध्ये आता वैयक्तिक शौचालयांची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक शौचालयांचा वापर अत्यल्प झाला असून ते निष्प्रयोजन ठरत आहेत. यामुळे नागरिकांकडून आता या जीर्ण व धोकादायक शौचालयांना पाडून त्या जागेचा समाजोपयोगी कामांसाठी वापर करण्याची मागणी जोर धरत आहे. काही ठिकाणी अंगणवाडी, अभ्यासिका, व्यायामशाळा किंवा लहान मुलांसाठी खेळाचे मैदान उभारण्याचे प्रस्तावही पुढे आले आहेत. दरम्यान, स्वच्छ भारत मिशन आणि हागणदारीमुक्त शहराचे दावे करणाऱ्या प्रशासनावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


स्वच्छतेचे दावे करणाऱ्या प्रशासनासमोर आता प्रत्यक्ष स्थितीचा आरसा उभा ठाकला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या या गंभीर प्रश्नावर महापालिका प्रशासन तात्काळ काय निर्णय घेते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button