मध्यरात्री कामरगावजवळ राख घेऊन जाणारा ट्रक पलटी |

अमरावती जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे… कामरगाव जवळ मध्यरात्री राख घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला असून, रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे अपघातांचे सत्र सुरूच आहे. या अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली असली, तरी प्रशासनाच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे…
अमरावती ते कारंजा लाड महामार्गावर कामरगाव परिसरात सध्या रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र या कामात नियोजनाचा पूर्ण अभाव असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. रविवारी मध्यरात्री सुमारे १२:३० वाजताच्या सुमारास, अमरावतीकडून राख घेऊन जाणारा ट्रक — क्रमांक MH 27 DT 2082 — अचानक रस्त्यावर पलटी झाला.
प्राथमिक माहितीनुसार, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आणि खोदकाम सुरू असल्यामुळे चालकाला अंदाज न आल्याने हा अपघात घडला.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी ट्रकचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, रस्त्यावर कोणतेही धोक्याचे फलक नाहीत,
ना पुरेशी प्रकाश व्यवस्था… त्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांसाठी हा मार्ग धोकादायक ठरत आहे.
सध्या या महामार्गावर दोन ते तीन ठिकाणी काम सुरू असून, दररोज दोन ते तीन अपघात घडत असल्याची माहिती समोर येत आहे.
या सततच्या अपघातांमुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
प्रशासनाने आणि संबंधित कंत्राटदाराने त्वरित दखल घेऊन सुरक्षिततेची उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
रस्त्याचे काम सुरू असताना सुरक्षिततेचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे… परंतु कामरगाव येथील परिस्थिती पाहता प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे… आता तरी संबंधित यंत्रणा जागी होणार का…? हा प्रश्न उपस्थित होत आहे…



