महिनाभर नोंदणी तरीही गॅस नाही! पवनीतील भावना इंडेन गॅस एजन्सीविरोधात नागरिकांचा संताप

तासनतास रांगा लावूनही रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याचा आरोप; आंदोलनाचा इशारा
भंडारा प्रतिनिधी
घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिकांना आता अक्षरशः संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे पाहायला मिळत आहे. भावना इंडेन गॅस एजन्सीच्या कथित हलगर्जी कारभारामुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, महिनाभरापूर्वी गॅस सिलेंडरची नोंदणी करूनही अद्याप पुरवठा मिळत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
घरगुती वापरासाठी अत्यावश्यक असलेल्या गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांना दररोज एजन्सीसमोर तासनतास रांगा लावाव्या लागत आहेत. मात्र, दीर्घ प्रतीक्षा करूनही अनेकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत असल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे. गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी दिवसाचा मोठा वेळ खर्च होत असल्याने त्यांच्या दैनंदिन कामकाजावरही परिणाम होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, सिलेंडरचा पुरवठा नेमका कधी होणार याबाबत एजन्सीकडून कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नाही. वारंवार चौकशी करूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे.
गॅस सिलेंडरच्या अभावामुळे अनेक कुटुंबांचे घरगुती नियोजन विस्कळीत झाले असून स्वयंपाकासह दैनंदिन गरजांवर परिणाम होत आहे. जीवनावश्यक सेवेमध्ये होत असलेल्या या कथित निष्काळजीपणामुळे नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
परिस्थिती सुधारण्यासाठी संबंधित प्रशासनाने आणि तेल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष घालून गॅस पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.
दरम्यान, लवकरात लवकर प्रश्न निकाली काढला नाही तर भावना इंडेन गॅस एजन्सीविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे आता प्रशासन आणि संबंधित यंत्रणा याकडे किती गांभीर्याने लक्ष देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



