मुदखेड तालुक्यात पुन्हा बिबट्याची दहशत; शिखाची वाडी येथे शेळीवर हल्ला

भरदिवसा बिबट्याचा हल्ला; एका शेळीचा फडशा, शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
मुदखेड प्रतिनिधी
मुदखेड तालुक्यातील शिखाची वाडी परिसरात बिबट्याचा वावर पुन्हा वाढल्याचे समोर आले असून, आज सायंकाळी झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याने शेळ्यांच्या कळपावर अचानक हल्ला करून एका शेळीचा फडशा पाडल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिखाची वाडी येथील शेतशिवारात आज सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या दरम्यान शेळ्या चरत होत्या. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक शेळ्यांच्या कळपावर झडप घातली. या हल्ल्यात एका शेळीचा जागीच मृत्यू झाला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत बिबट्या तेथून पसार झाला होता. या घटनेमुळे शिखाची वाडीसह आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या शेतीकामांचा हंगाम सुरू असून शेतकरी आणि शेतमजूर मोठ्या प्रमाणात शेतात कामासाठी जात आहेत. अशा परिस्थितीत भरदिवसा बिबट्याने हल्ला केल्यामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. “आता शेतात कामासाठी जाणेही धोक्याचे झाले आहे,” अशी प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांनी वन विभागाने तातडीने परिसराची पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. तसेच पीडित शेतकऱ्याला नुकसानभरपाई देण्यात यावी, अशीही मागणी होत आहे.
ग्रामस्थांनी नागरिकांना विशेषतः सायंकाळच्या आणि पहाटेच्या वेळी शेतात एकटे न जाण्याचे आवाहन केले आहे. तसेच लहान मुले आणि पाळीव जनावरांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वन विभागाने या घटनेची त्वरित दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.



