जेवड नगरात मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४०० हून अधिक रुग्णांना लाभ

सेवा, त्याग आणि समर्पण ही केवळ शब्दांची मांडणी नसून काहींसाठी तीच जीवनशैली असते. याच सेवाभावी विचारातून जेवड नगरमध्ये एक प्रेरणादायी सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘शंभर सेवा उपक्रम’ या संकल्पनेतून जेवड नगर येथे भव्य मोफत रोग निदान आणि औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले.
श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर संस्था, जेवड नगर येथे आयोजित या शिबिराला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. तब्बल ४०० हून अधिक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेत मोफत आरोग्य तपासणी आणि उपचारांचा लाभ घेतला.
या उपक्रमामागे समाजसेवक चंद्रकुमार ऊर्फ लप्पीसेठ जाजोदिया यांची पुढाकाराची भूमिका महत्त्वाची ठरली. समाजासाठी आरोग्य सेवा घराघरात पोहोचवण्याच्या उद्देशाने त्यांनी या शिबिराचे आयोजन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवर आणि डॉक्टरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मानही यावेळी करण्यात आला.
या शिबिरात धन्वंतरी रुग्णालयाच्या डॉ. साक्षी जिंतुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनुभवी डॉक्टरांच्या टीमने रुग्णांची तपासणी केली. जनरल फिजिशियन, नेत्ररोग, हाडांचे विकार आणि दंत तपासणी अशा विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून आवश्यक उपचार व सल्ला दिला.
याशिवाय ब्लड शुगर, ब्लड प्रेशर आणि हिमोग्लोबिन यांसारख्या महत्त्वाच्या तपासण्या देखील मोफत करण्यात आल्या. सकाळपासूनच शिबिरस्थळी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान आणि कृतज्ञतेची भावना स्पष्ट दिसत होती.
या शिबिरामुळे आरोग्य सेवा थेट नागरिकांच्या दारी पोहोचल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली. आरोग्याबाबत जनजागृती आणि वेळेवर उपचार या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याचे नागरिकांनी सांगितले.
सेवेच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरत असून, पुढील काळातही अशाच सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे. समाजसेवा हीच खरी देशसेवा असल्याचा संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाला.



