AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

‘स्वच्छ शहर’च्या दाव्यांना बडनेऱ्यात चपराक; सार्वजनिक शौचालयेच ठरली नागरिकांसाठी शाप

स्वच्छ शहराच्या गप्पा मारणाऱ्या प्रशासनाचा खरा चेहरा पाहायचा असेल, तर अमरावतीच्या बडनेरा भागात एकदा फेरफटका मारलाच पाहिजे. कारण इथे ‘सार्वजनिक शौचालय’ नावाची सुविधा आज नागरिकांसाठी सोय नसून थेट शाप ठरत आहे. प्रभाग क्रमांक २२ मधील शिवाजी नगर आणि रज्जा नगर परिसरात सार्वजनिक शौचालयांची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, नागरिकांच्या आरोग्याशी आणि सन्मानाशी सरळ खेळ सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

शिवाजी नगरमधील सार्वजनिक शौचालय परिसरात गेल्यावर सर्वप्रथम असह्य दुर्गंधीचा सामना करावा लागतो. काही सेकंदही उभे राहणे कठीण होईल, अशी परिस्थिती येथे निर्माण झाली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दोन महिन्यांपूर्वी महानगरपालिकेने सेफ्टी टँक साफ करण्यासाठी टँकचे झाकण फोडले, मात्र टँक साफच केला नाही. परिणामी आजही टँक उघडाच पडून आहे. त्या उघड्या टँकमधून दुर्गंधी, घाण, डास आणि माशांचा प्रचंड उपद्रव सुरू आहे.

पावसाळ्यात हीच घाण अळ्यांच्या स्वरूपात थेट घरात शिरते, असा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. यामुळे लहान मुले, वृद्ध आणि महिलांच्या आरोग्यावर मोठा धोका निर्माण झाला आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासनांपलीकडे कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.

संतप्त नागरिकांनी आता थेट ही सार्वजनिक शौचालये पाडण्याची मागणी केली आहे. या ठिकाणी अंगणवाडी, अभ्यासिका किंवा समाजोपयोगी इमारत उभारावी, अशी मागणी स्थानिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

दरम्यान, रज्जा नगरमधील सार्वजनिक शौचालयाची अवस्था तर आणखी गंभीर आहे. तुटलेले दरवाजे, उडालेली टिनपत्रे, फुटलेल्या सिट्स, पाण्याची व विजेची कोणतीही व्यवस्था नाही—म्हणजे शौचालय केवळ नावालाच उरले आहे. परिणामी नागरिकांना उघड्यावर शौचास जाण्याची वेळ आली आहे.

याचा सर्वाधिक फटका महिलांना बसत आहे. रात्रीच्या वेळी महिलांना जीव मुठीत धरून बाहेर जावे लागत असल्याने हा प्रश्न केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो सुरक्षेचा, सन्मानाचा आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न बनला आहे.

‘स्वच्छ भारत’, ‘हागणदारीमुक्त शहर’ अशा घोषणा फक्त बॅनरपुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत का, असा सवाल आता स्थानिक नागरिक विचारत आहेत. जमिनीवर मात्र घाण, दुर्गंधी आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा दिसत असल्याची टीका होत आहे.

नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, तात्काळ उपाययोजना न झाल्यास महानगरपालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. बडनेऱ्यातील ही परिस्थिती केवळ एका भागाचा प्रश्न नसून शहरातील स्वच्छतेच्या दाव्यांवर मोठे प्रश्नचिन्ह उभे करणारी ठरत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button