सिटी न्यूजचा दणका! १२ तासांत जागं झालं प्रशासन; जमील कॉलोनीतील कचऱ्याचे ढिगारे अखेर हटले

अमरावती शहरात स्वच्छतेच्या नावाखाली प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या कामकाजावर पुन्हा एकदा मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. पश्चिम क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ४ मधील जमील कॉलोनीत कचऱ्याचे ढिगारे साचल्याने नागरिक अक्षरशः त्रस्त झाले होते. दुर्गंधी, अस्वच्छता आणि आजारांच्या भीतीत नागरिक दिवस काढत होते. मात्र सिटी न्यूजने हा प्रश्न थेट प्रशासनापर्यंत पोहोचवताच अवघ्या १२ तासांत संपूर्ण परिसराची साफसफाई करण्यात आली.
अमरावतीच्या पश्चिम भागातील जमील कॉलोनीत काही दिवसांपासून कचऱ्याचे ढिगारे साचले होते. रस्त्याच्या कडेला साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली होती आणि नागरिकांना नाक दाबून वावरण्याची वेळ आली होती. परिसरातील लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत होता. घाणीमुळे आजार पसरण्याची भीतीही निर्माण झाली होती.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मोठ्या अपेक्षेने त्यांनी एमआयएमचे चार नगरसेवक निवडून दिले. मात्र निवडणुकीनंतर अवघ्या काही महिन्यांतच परिसरातील मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला. “मत मागताना मोठी आश्वासने दिली, पण आता परिसरात फिरकायलाही वेळ नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली.
या संपूर्ण प्रकरणाची सिटी न्यूजने ग्राउंड रिपोर्टिंग करत प्रत्यक्ष परिस्थिती समोर आणली. नागरिकांच्या तक्रारी, परिसरातील अस्वच्छतेचे वास्तव आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेचा पर्दाफाश सिटी न्यूजने केला. ही बातमी समोर येताच प्रशासनात एकच खळबळ उडाली.
विशेष म्हणजे, सिटी न्यूजचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचताच अवघ्या १२ तासांत जमील कॉलोनीत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. कचऱ्याचे ढिगारे हटवण्यात आले, परिसराची साफसफाई करण्यात आली आणि नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.
जमील कॉलोनीतील ही घटना केवळ एका भागाची समस्या नाही, तर प्रशासनाच्या कामकाजावर आणि लोकप्रतिनिधींच्या जबाबदारीवर प्रश्न उपस्थित करणारे जिवंत उदाहरण आहे. माध्यमांनी प्रश्न उचलल्यानंतरच प्रशासन जागं होत असेल, तर ही व्यवस्था नेमकी कोणासाठी काम करते, असा सवाल आता नागरिक विचारत आहेत.
सिटी न्यूजने पुन्हा एकदा सिद्ध केलं — बातमी फक्त दाखवायची नाही, तर प्रश्न सुटला पाहिजे.



