नागपुरात किरकोळ वादातून रक्तरंजित खून; कळमण्यात तरुणाची निर्घृण हत्या, मुख्य आरोपी अटकेत

नागपूर शहरातील कळमणा परिसरातून एक धक्कादायक खूनप्रकरण समोर आलं आहे. किरकोळ कारणावरून झालेला वाद थेट रक्तरंजित हत्येत बदलला आणि एका २७ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेमुळे कळमणा परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
ही थरकाप उडवणारी घटना २४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.५५ वाजण्याच्या सुमारास नागपूर शहरातील कळमणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मदनी चौक, काच कंपनी परिसरात घडली. रोशन धरमसिंग उईके (वय २७) हा तरुण गंभीर जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला आढळून आला. त्याच्या मानेवर, पोटावर आणि तोंडावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते.
घटनेची माहिती मिळताच कळमणा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेतील रोशन उईके याला त्वरित मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केलं. या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली.
पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार तपासाची चक्रे वेगाने फिरवली. प्राथमिक तपासात जावेद उर्फ लाल शकील अंसारी, शहबाज जहीर खान, तसेच सलमान आणि सुलतान या चौघांनी संगनमत करून रोशनवर धारदार शस्त्र आणि काठीने हल्ला केल्याचं समोर आलं आहे.
या प्रकरणी पोलीस कर्मचारी राकेश बेटवार यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळमणा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुख्य आरोपी जावेद उर्फ लाल शकील अंसारी याला अटक केली आहे. तर उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
या खूनप्रकरणामुळे नागपूरमधील वाढत्या गुन्हेगारीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. किरकोळ कारणावरून वाढणारी हिंसक प्रवृत्ती चिंतेचा विषय ठरत आहे. पोलिसांनी तपासाला वेग दिला असून फरार आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
किरकोळ वाद… धारदार शस्त्रांचा मारा… आणि तरुणाचा जीव… नागपुरातील ही घटना शहरातील कायदा-सुव्यवस्थेसमोर गंभीर आव्हान उभं करत आहे.



