परतवाड्यात मोठा अनर्थ टळला! पेट्रोल पंपावर शॉर्टसर्किटमुळे आग, कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने संकट टळलं

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरात आज एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. दुरानी चौक परिसरातील पेट्रोल पंपावर अचानक आग भडकली. पेट्रोल पंपासारख्या अतिसंवेदनशील ठिकाणी आग लागल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आणि अग्निशमन दलाच्या तातडीच्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, परतवाडा येथील दुरानी चौकातील पेट्रोल पंपावर शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण करत पेट्रोल पंपाच्या वरच्या भागाला वेढा घातला. पेट्रोल आणि डिझेल साठा असलेल्या या ठिकाणी आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची तीव्रता ओळखून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ अग्निरोधक सिलेंडरचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. कर्मचाऱ्यांच्या या धाडसी आणि तत्पर कृतीमुळे आग अधिक पसरली नाही. याचदरम्यान अचलपूर नगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी वेगाने आणि शिताफीने कारवाई करत पेट्रोल पंपाच्या वर पसरलेल्या ज्वाळांवर नियंत्रण मिळवले आणि काही वेळातच आग पूर्णपणे विझवण्यात यश मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वेळेत कारवाई झाली नसती तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता आली नसती.
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेचे आणि अग्निशमन दलाच्या जलद प्रतिसादाचे कौतुक केले. सध्या या घटनेची अधिक चौकशी सुरू असून, नेमकं कारण शोधण्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे.
परतवाड्यातील ही घटना पुन्हा एकदा सतर्कतेचं महत्त्व अधोरेखित करणारी ठरली आहे…
कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांच्या धाडसामुळे आणि अग्निशमन दलाच्या वेगवान कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला…



