अमरावतीत कोट्यवधींचं MD ड्रग्स रॅकेट उद्ध्वस्त! फरार आरोपी जेरबंद, आतापर्यंत 10 जण अटकेत

अमरावती शहरात अंमली पदार्थांविरोधात गुन्हे शाखेने मोठी धडक कारवाई करत कोट्यवधींच्या एमडी म्हणजेच मॅफेड्रॉन ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीतील या मोठ्या कारवाईत फरार आरोपींना अखेर पोलिसांनी जेरबंद केलं असून, या प्रकरणात आतापर्यंत एकूण १० आरोपींना अटक करण्यात आली आहे.
८ मार्च २०२६ रोजी अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं होतं. त्यांच्या ताब्यातून तब्बल २ किलो ८० ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आलं. या अंमली पदार्थांची बाजारातील किंमत सुमारे ३ कोटी १२ लाख रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईमुळे अमरावतीत सुरू असलेल्या ड्रग्स नेटवर्कचा मोठा भांडाफोड झाला होता.
तपासादरम्यान या एमडी ड्रग्सची साखळी थेट मुंबईपर्यंत पोहोचत असल्याचं निष्पन्न झालं. मुंबईहून अमरावतीत अंमली पदार्थांचा पुरवठा केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याचं उघड झाल्यानंतर गुन्हे शाखेने तपासाची व्याप्ती वाढवली.
दरम्यान, या गुन्ह्यातील दोन फरार आरोपी — अब्बास कुरेशी आणि सकीब कुरेशी — हे अमरावतीत येणार असल्याची खात्रीलायक माहिती गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे २४ एप्रिल २०२६ रोजी सुफियान नगर परिसरात सापळा रचत पोलिसांनी दोन्ही आरोपींना शिताफीने ताब्यात घेतलं. पोलिसांच्या तपासात या दोघांवर यापूर्वीही अंमली पदार्थांशी संबंधित गुन्हे दाखल असल्याचं समोर आलं आहे.
शुक्रवारी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयाने त्यांना २७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात आतापर्यंत एकूण १० आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास अमरावती गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली असून, अमरावतीतील वाढत्या अंमली पदार्थांच्या जाळ्यावर पोलिसांनी मोठा आघात केल्याचं मानलं जात आहे.
अमरावतीत कोट्यवधींच्या ड्रग्स रॅकेटवर पोलिसांनी मोठा घाव घातला आहे…
या कारवाईमुळे ड्रग्स माफियांमध्ये खळबळ उडाली असून…
पुढील तपासात आणखी मोठे आणि धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे…



