citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

नागपुरात IPL सट्टेबाजीचा मोठा अड्डा उद्ध्वस्त! 7 आरोपी रंगेहात जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

नागपूर शहरात सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सट्टेबाजीवर गुन्हेशाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने मोठी धडक कारवाई करत अवैध बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. सदर बाजार परिसरातील एका फ्लॅटवर छापा टाकत पोलिसांनी तब्बल ७ आरोपींना रंगेहात पकडले असून, मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले आहे.

२३ एप्रिल २०२६ रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सदर पोलीस ठाणे हद्दीतील सदर बाजार परिसरात असलेल्या अमर सज्जन अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक ३०२ मध्ये आयपीएल सामन्यावर अवैध सट्टेबाजी सुरू असल्याची खात्रीशीर माहिती गुन्हेशाखेच्या घरफोडी विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत संबंधित ठिकाणी छापा टाकला.

छाप्यामध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या आयपीएल सामन्यावर ऑनलाइन माध्यमातून सट्टा घेताना ७ आरोपींना रंगेहात पकडण्यात आले. आरोपी ऑनलाइन लिंक, मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करून लोकांकडून पैसे स्वीकारत क्रिकेट बेटिंगचा अवैध व्यवसाय चालवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आरोपी हे सट्टेबाजीचे संपूर्ण रॅकेट चालवत असल्याची माहिती समोर आली आहे.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी १ लॅपटॉप, ५ मोबाईल फोन, सट्टेबाजीची नोंद असलेले लॉगबुक आणि इतर साहित्य असा एकूण २ लाख ३३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ आणि ५ तसेच आयटी अॅक्ट कलम ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

नागपुरात सुरू असलेल्या क्रिकेट सट्टेबाजीवर पोलिसांनी मोठा घाव घातला आहे…
या कारवाईमुळे शहरातील अवैध बेटिंग रॅकेटचे धागेदोरे उघड होण्याची शक्यता असून…
पुढील तपासात आणखी मोठे खुलासे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही…

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button