नांदेडमध्ये महिला आरक्षणावरून जनआक्रोश; काँग्रेसविरोधात महिलांचा जोरदार मोर्चा

नांदेड : महिलांना ३३ टक्के आरक्षणाच्या मुद्द्यावरून नांदेडमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भाजपच्या वतीने काँग्रेसविरोधात महिलांनी जोरदार जनआक्रोश आंदोलन छेडले. या आंदोलनात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेत रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला.
केंद्र सरकारने संसदेत सादर केलेल्या ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाला विरोधकांनी विरोध केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभर आंदोलनांची मालिका सुरू असून, नांदेडमध्येही महिलांनी आक्रमक भूमिका घेतली.
शहरातील महात्मा फुले पुतळ्यासमोर हे आंदोलन पार पडले. यावेळी महिलांनी काँग्रेसविरोधात तसेच राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की, महिलांच्या हक्कांबाबत काँग्रेसची भूमिका दुटप्पी असून आरक्षणाच्या मुद्द्यावर महिलांची फसवणूक करण्यात आली आहे.
या आंदोलनात शहरातील विविध भागांतून आलेल्या महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आपला रोष व्यक्त केला.
दरम्यान, या आंदोलनामुळे नांदेडमधील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे असून, महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुढील काळात राजकारण अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



