नांदेडमध्ये भीषण अपघात; दुचाकी-कारच्या धडकेत आई, मुलगा व आत्यासह तिघांचा जागीच मृत्यू

नांदेड : हदगाव तालुक्यातील हडसनी गावाजवळ भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन दुचाकी आणि एका कारमध्ये झालेल्या जोरदार धडकेत हा अपघात घडला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास निवघा बाजार येथील यशवंत नरवाडे हे आपल्या आई रेखाबाई आणि आत्या अनुसयाबाई लोणारे यांना दुचाकीवरून घेऊन जात होते. हडसनी गावाजवळ पोहोचताच भरधाव वेगात येणाऱ्या स्वीफ्ट कारने आणि दुसऱ्या एका दुचाकीने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील तिघेजण दूरवर फेकले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दुसऱ्या दुचाकीवरील एक व्यक्ती आणि कारमधील एक व्यक्ती गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. दरम्यान, पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला असून भरधाव वेग आणि निष्काळजी वाहनचालकत्व हेच अपघाताचे प्राथमिक कारण असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे आणि वेगावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे पुन्हा एकदा या घटनेतून अधोरेखित झाले आहे.



