अमरावती मनपात महिला आरक्षणावरून राजकीय रणकंदन; महिला नगरसेविकांचा काँग्रेसविरोधात मोर्चा

अमरावती : महानगरपालिकेत आज महिला आरक्षण आणि ‘नारीशक्ती वंदन’ कायद्याच्या मुद्द्यावरून जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. विविध पक्षांच्या महिला नगरसेविकांनी काँग्रेसविरोधात आक्रमक भूमिका घेत मोर्चा काढत घोषणाबाजी केली, त्यामुळे सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
भाजप, युवा स्वाभिमान, राष्ट्रवादी आणि शिंदे गटाच्या महिला नगरसेविकांनी मनपा गेटपासून सभागृहापर्यंत मोर्चा काढला. ‘काँग्रेस द्वारा महिलाओं का अपमान नही सहेगा हिंदुस्तान’ आणि ‘नारीशक्ती वंदन कायद्याचा विरोध करणाऱ्या काँग्रेसचा निषेध असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. महिला नगरसेविकांनी आरोप केला की, संसदेत ३३ टक्के महिला आरक्षणाचा प्रस्ताव काँग्रेसमुळे अडला असून काँग्रेसची भूमिका महिलांविरोधी आहे.
यावेळी नगरसेविका सुरेखा लुंगारे यांनी महिलांच्या अधिकार आणि आत्मसन्मानाचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसवर जोरदार टीका केली. दरम्यान, काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक मिलिंद चिमोटे यांनी प्रत्युत्तर देताना, महिलांना आरक्षण काँग्रेसमुळेच मिळाले असल्याचे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यानंतर वातावरण आणखी तापले आणि महिला नगरसेविकांनी त्यांना घेरत घोषणाबाजी केली.
महिला नगरसेविकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत २०२९ पर्यंत महिला आरक्षणासाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
या सर्व घडामोडींमुळे अमरावती महानगरपालिकेच्या सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. महिला आरक्षण आणि नारीशक्ती वंदन कायद्यावरून सुरू असलेला हा वाद पुढे आणखी तीव्र होण्याची शक्यता असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.



