उत्तमसरा ग्रामपंचायतीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार? नागरिकांचे अन्नत्याग आंदोलन; चौकशीची मागणी तीव्र

भातकुली तालुक्यातील उत्तमसरा ग्रामपंचायतीत कोट्यवधी रुपयांच्या निधीमध्ये मोठ्या गैरव्यवहाराचा आरोप समोर आला असून, संतप्त नागरिकांनी थेट गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. २०१९ ते २०२५ या कालावधीत ग्रामपंचायतीमार्फत झालेल्या विविध विकासकामांमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, जिल्हा परिषद शाळेच्या मैदानाचे काम, १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात आलेली विकासकामे, तसेच ले-आऊटमधील रस्ते, नाल्या, पाणीपुरवठा आणि इतर मूलभूत सुविधांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. अनेक कामे कागदोपत्री पूर्ण दाखवण्यात आली, मात्र प्रत्यक्षात ती अपूर्ण असल्याचा दावा करण्यात येत आहे.
उपोषणकर्ते अभिषेक सवई यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, ग्रामपंचायतीने ले-आऊटमधील प्लॉटधारकांकडून पैसे घेतले, मात्र त्याबदल्यात आवश्यक सुविधा दिल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना आजही खराब रस्ते, नाल्यांचा अभाव आणि पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
याशिवाय ग्रामपंचायतीमार्फत शिक्षक आणि कर्मचाऱ्यांकडून घरभाड्याच्या नावाखाली पैसे वसूल करण्यात आल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, नागरिकांनी या सर्व प्रकरणाची तात्काळ, निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि टोकाची पावले उचलली जातील, असा इशाराही उपोषणकर्त्यांनी दिला आहे.
उत्तमसरा ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचारामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे विकासाच्या नावाखाली कोट्यवधींचा निधी खर्च झाल्याचे दाखवले जात असताना, दुसरीकडे नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
आता या प्रकरणात प्रशासन नेमकी काय भूमिका घेते, चौकशी होते का आणि नागरिकांना न्याय मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



