AmravatiAmravatiMahanagarpalikaAmravatiMunicipalCorporationcitynewsLatest NewsMaharashtra

अमरावती मनपा आयुक्तांची उत्तर झोनमध्ये पाहणी; स्वच्छता व नागरी सुविधांबाबत अधिकाऱ्यांना कडक निर्देश

नालेसफाई, कचरा व्यवस्थापन, झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी आणि पाणी निचऱ्याच्या कामांचा घेतला आढावा

अमरावती | प्रतिनिधी

अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी सोमवारी उत्तर झोन क्रमांक एकमधील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छता, नाल्यांची साफसफाई, कचरा व्यवस्थापन, झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी तसेच नागरी सुविधांचा आढावा घेतला. यावेळी नागरिकांच्या तक्रारी ऐकून संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे कडक निर्देश त्यांनी दिले.

आयुक्तांनी उत्तर झोन अंतर्गत रामपुरी कॅम्प परिसरासह शेगाव–रहाटगाव भागाची पाहणी केली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाल्यांमधील गाळ आणि कचरा तातडीने हटविण्याच्या सूचना देत स्वच्छता आणि पाणी निचऱ्याच्या कामांची तपासणी केली.

यानंतर आशियाड कॉलनी, सन्मती कॉलनी, रहाटगाव रिंग रोड, आराधना कॉलनी चौक, पोटे कॉलेज रोड आणि पदम सौरभ कॉलनी परिसरात भेट देऊन स्वच्छता, कचरा संकलन, रस्त्यांची स्थिती आणि पाणी निचऱ्याच्या व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढिग साचणार नाहीत याची खबरदारी घेण्याचे तसेच धोकादायक झाडांच्या फांद्यांची तातडीने छाटणी करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

याशिवाय, शेगाव येथील महानगरपालिका सेमी इंग्लिश शाळा, रहाटगाव स्मशानभूमी आणि आरोग्य वर्धिनी केंद्रालाही आयुक्तांनी भेट दिली. या ठिकाणी उपलब्ध मूलभूत सुविधांची पाहणी करत विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण, नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा आणि परिसरात स्वच्छता राखण्यावर भर देण्यात आला.

पाहणीदरम्यान डॉ. गोंदावले यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि तक्रारी जाणून घेतल्या. संबंधित विभागांनी या तक्रारींचे तातडीने निराकरण करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

पावसाळ्यात शहरात पाणी साचू नये, स्वच्छता अबाधित राहावी आणि नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करण्याच्या स्पष्ट सूचना आयुक्तांनी दिल्या.

महानगरपालिका प्रशासनाकडून शहरातील नागरी सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी आणि कामांच्या आढाव्यावर भर दिला जात असला, तरी या सूचनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत प्रभावीपणे होते, याकडे आता अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button