BuldhanacitynewsLatest NewsMaharashtra

मेहकरमध्ये दमदार पावसाची हजेरी; खरीप पिकांना नवसंजीवनी, शेतकऱ्यांना दिलासा

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मुसळधार पाऊस; वातावरणात गारवा, सखल भागांत पाणी साचले

मेहकर | प्रतिनिधी

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहर आणि परिसरात रविवारी (३ ऑगस्ट) झालेल्या दमदार पावसामुळे नागरिकांना उकाड्यातून दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. अनेक दिवसांपासून रिमझिम स्वरूपात सुरू असलेल्या पावसानंतर झालेल्या या जोरदार सरींमुळे खरीप पिकांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मेहकर शहरासह तालुक्यातील विविध भागांत दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उष्णतेचा प्रभाव कमी झाला. शहरातील काही सखल भागांमध्ये पाणी साचल्याने काही काळ वाहतुकीचा वेग मंदावल्याचे चित्रही पाहायला मिळाले.

गेल्या काही दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद, संग्रामपूर आणि मोताळा परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे, केळी बागांचे तसेच काही घरांचे नुकसान झाले होते. काही ठिकाणी सुपीक माती वाहून गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता.

दरम्यान, आज झालेल्या पावसामुळे मेहकर तालुक्यातील खंडाळा देवी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. हळद, सोयाबीन, तूर, मका आणि ज्वारी यांसारख्या खरीप पिकांसाठी हा पाऊस अत्यंत लाभदायक ठरणार असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पिकांच्या वाढीसाठी आवश्यक ओलावा मिळाल्याने उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पावसामुळे शहरातील काही रस्त्यांवर पाणी साचले असले, तरी शेतीच्या दृष्टीने हा पाऊस दिलासादायक ठरल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे.

दरम्यान, हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, तसेच प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button