वाशिमच्या राजकारणात मोठी घडामोड; विविध पक्षांतील शंभरहून अधिक पदाधिकारी आज भाजपमध्ये प्रवेश करणार

अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव गट आणि काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांचा मुंबईत पक्षप्रवेश; जिल्ह्यात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा
वाशिम | प्रतिनिधी
वाशिम जिल्ह्याच्या राजकारणात आज महत्त्वाची घडामोड घडणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तसेच काँग्रेसमधील शंभरहून अधिक आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग कोठाळे, काँग्रेसचे वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेव काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभापती भास्कर शेगीकर, तसेच शिवसेना (शिंदे गट)चे जिल्हाप्रमुख विजय खानझोडे यांच्यासह विविध पक्षांतील अनेक प्रमुख पदाधिकारी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत.
याशिवाय कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी जिल्हाप्रमुख तसेच विविध पक्षांचे अनेक आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्तेही या पक्षप्रवेशात सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे.
हा पक्षप्रवेश वाशिम विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार श्याम खोडे यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दुपारी मुंबई येथे पार पडणार आहे.
या पक्षप्रवेशासाठी संबंधित पदाधिकारी आणि कार्यकर्ते वाशिमहून मुंबईकडे रवाना झाले असून, पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाकडे जिल्ह्याचे राजकीय वर्तुळ लक्ष ठेवून आहे.
या मोठ्या पक्षप्रवेशामुळे वाशिम जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर नेमका काय परिणाम होतो, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांवर त्याचा किती प्रभाव पडतो, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.



