citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

सात महिन्यांपासून फरार एनडीपीएस प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत; पारडी पोलिसांची धडक कारवाई

साडेतीन किलो गांजा जप्ती प्रकरणातील आरोपी कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान गोणमोळ्ला परिसरातून जेरबंद

नागपूर | प्रतिनिधी

नागपूर शहरातील पारडी पोलिसांनी सात महिन्यांपासून फरार असलेल्या एनडीपीएस प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात मोठे यश मिळवले आहे. साडेतीन किलो गांजा जप्ती प्रकरणातील आरोपीला झोन-५ अंतर्गत राबविण्यात आलेल्या संयुक्त कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान गोणमोळ्ला परिसरातून शिताफीने अटक करण्यात आली. आरोपीला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

पारडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील मुख्य फरार आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. या प्रकरणात यापूर्वी रोधना जुगराज सोनार या महिला आरोपीला अटक करण्यात आली होती. तिच्याकडून सुमारे साडेतीन किलो गांजा जप्त करण्यात आला होता.

मात्र, या गुन्ह्यातील दुसरा मुख्य आरोपी रुपेश कुंदन लोखंडे (वय २३), रा. उडिया मोहल्ला, गोणमोळ्ला, भांडेवाडी हा गेल्या सात महिन्यांपासून फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी पारडी पोलीस सातत्याने प्रयत्न करत होते.

दरम्यान, झोन-५ च्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या संयुक्त कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान आरोपी गोणमोळ्ला परिसरात लपून बसल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसराची बारकाईने रेकी केली. आरोपी मागील मार्गाने पसार होऊ नये म्हणून परिसराला चारही बाजूंनी घेराव घालत सापळा रचण्यात आला.

यानंतर पोलिसांनी शिताफीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली. आरोपीकडून अंमली पदार्थांच्या पुरवठा साखळीबाबत आणि या प्रकरणातील इतर संबंधित बाबींची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सात महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्यात पारडी पोलिसांना यश आल्याने या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून तपासादरम्यान आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button