citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

लग्नासाठी निघालेल्या तरुणीचा दुर्दैवी अंत; स्कूटर घसरल्यानंतर अज्ञात वाहनाची धडक, २३ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील कान्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर भीषण अपघात झाला आहे. एमएचएसके पेट्रोल पंपाजवळ झालेल्या या दुर्घटनेत २३ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून, तिच्यासोबत असलेल्या अन्य दोन तरुणी गंभीर जखमी झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रश्मी विनोद बागडे ही तरुणी आपल्या दोन मैत्रिणींसह वाघोली गावात एका मैत्रिणीच्या लग्नासाठी स्कूटरवरून जात होती. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावर स्कूटरचा ताबा सुटल्याने वाहन घसरले आणि तिन्ही तरुणी रस्त्यावर पडल्या.

याच वेळी मागून वेगाने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने रश्मी बागडे हिला जोरदार धडक दिली. या धडकेत तिचा जागीच मृत्यू झाला. तर तिच्यासोबत असलेल्या अन्य दोघी गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच कान्हान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांच्या मदतीने आरोपी वाहनाचा शोध सुरू आहे.

या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, महामार्गावरील बेदरकार वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button