राजापेठ–बडनेरा फूटपाथवर अतिक्रमणाची छाया; पादचाऱ्यांसाठी की पार्किंगसाठी?

अमरावतीतील राजापेठ ते बडनेरा दरम्यान सुरू असलेल्या चौपदरी रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, आता पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र फूटपाथ उभारण्याचे कामही वेगाने सुरू आहे. सहा ते आठ फूट रुंदीचा हा फूटपाथ नागरिकांना सुरक्षित आणि मोकळ्या वातावरणात चालता यावे, या उद्देशाने लाखो रुपयांचा खर्च करून तयार केला जात आहे. मात्र, काम पूर्ण होण्यापूर्वीच या फूटपाथवर अतिक्रमण आणि पार्किंगचे सावट दिसू लागले आहे.
ज्या भागात फूटपाथचे काम पूर्ण झाले आहे, तेथे काही दुकानदारांनी आधीच आपले साहित्य मांडून अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पादचाऱ्यांसाठी राखीव असलेली जागा पुन्हा एकदा व्यावसायिकांच्या ताब्यात जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
याशिवाय, डी-मार्ट, तापडिया मॉल, विविध दवाखाने आणि मंगल कार्यालयांच्या परिसरात नव्याने तयार झालेल्या फूटपाथचा सर्रास पार्किंगसाठी वापर होत असल्याचे दिसून येत आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहने थेट फूटपाथवर उभी केली जात असल्याने पादचाऱ्यांना पुन्हा रस्त्यावरून चालण्याची वेळ येत आहे.
यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “लाखो रुपयांचा निधी खर्च करून तयार केलेला फूटपाथ काही मोजक्या व्यावसायिकांच्या फायद्यासाठीच वापरला जाणार का?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
अतिक्रमणावर कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या मनपा प्रशासनावरही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुरुवातीपासूनच कठोर कारवाई न केल्यास हा फूटपाथही शहरातील इतर ठिकाणांप्रमाणे अतिक्रमणाच्या विळख्यात जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
नागरिकांच्या मते, “फूटपाथ पादचाऱ्यांसाठी असतो, पार्किंगसाठी नाही.” मात्र, सध्या मनपा प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.
आता सर्वांचे लक्ष महापालिका प्रशासनाच्या भूमिकेकडे लागले आहे. मनपा खरंच पादचाऱ्यांच्या हक्कासाठी उभी राहणार का, की पुन्हा एकदा अतिक्रमणासमोर शरणागती पत्करणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.



