NIT कुरुक्षेत्रमध्ये सलग चौथ्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर संताप; विद्यार्थ्यांची CBI चौकशीची मागणी

हरियाणातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, म्हणजेच NIT कुरुक्षेत्रमध्ये गेल्या दोन महिन्यांत चार विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटनांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. गुरुवारी आणखी एका विद्यार्थिनीचा मृतदेह वसतिगृहात आढळल्यानंतर विद्यार्थ्यांनी मध्यरात्री आंदोलन छेडत न्यायाची मागणी केली.
मृत विद्यार्थिनीचे नाव दीक्षा दुबे असून ती बिहारची रहिवासी होती. गुरुवारी तिचा मृतदेह वसतिगृहातील खोलीत आढळला. या घटनेनंतर शेकडो विद्यार्थी एकत्र जमले आणि “We Want Justice”च्या घोषणा देत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
विद्यार्थ्यांचा आरोप आहे की, संस्थेमध्ये प्रचंड शैक्षणिक ताण आहे आणि अशा घटनांमध्ये प्रशासनाकडून योग्य वेळी प्रतिसाद दिला जात नाही. विद्यार्थ्यांनी असा दावा केला की, दीक्षा दुबेचा मृतदेह आढळल्यानंतरही बराच वेळ तो तसाच खोलीत होता.
याशिवाय, काही प्राध्यापक विद्यार्थ्यांशी असंवेदनशीलपणे वागत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. एका प्राध्यापकाने विद्यार्थ्यांना “आत्महत्या करायची असेल तर ब्रह्मसरोवरमध्ये करा, संस्थेत नाही” असे सांगितल्याचा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
या सर्व घटनांमुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण प्रकरणाची CBI चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित प्राध्यापकांवर कारवाई, शैक्षणिक नियमांमध्ये बदल, री-अपीअर परीक्षांबाबत सवलत, चांगल्या आरोग्य सुविधा आणि विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी उशिरापर्यंत धरणे आंदोलन सुरू ठेवले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. पोलिस आणि प्रशासनाने विद्यार्थ्यांशी चर्चा केली. अखेर पहाटे सुमारे ३ वाजता विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. त्यांच्या मागण्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले.
दरम्यान, NIT प्रशासनाने १७ एप्रिल ते ४ मे या कालावधीत सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. मात्र, विद्यार्थ्यांचा आरोप आहे की, हे प्रकरण दडपण्यासाठीच सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या. सुट्ट्यांची घोषणा होताच अनेक विद्यार्थी घरी रवाना झाले.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने काही तातडीचे निर्णय घेतले आहेत. मुलींच्या वसतिगृहासाठी नवीन मुख्य वॉर्डन आणि उपमुख्य वॉर्डन नेमण्यात आले आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार एका प्राध्यापकाची बदली करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, दीक्षा दुबेच्या कुटुंबीयांनी कुरुक्षेत्रमध्ये येऊन मृतदेह ताब्यात घेतला. पोस्टमॉर्टेमनंतर पोलिसांनी मृतदेह कुटुंबीयांकडे सुपूर्द केला असून, अद्याप कुटुंबीयांकडून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
सलग चार विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे NIT कुरुक्षेत्रमधील वातावरण ढवळून निघाले आहे. आता विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर प्रशासन काय निर्णय घेते आणि या घटनांमागील कारणांचा तपास कसा होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



