इस्लापूरमध्ये पाण्यासाठी हाहाकार; संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीला ठोकलं टाळं

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील इस्लापूर शहरात पाणीटंचाईचा प्रश्न आता गंभीर बनला आहे. इस्लापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या साठे नगर परिसरातील नागरिक मागील दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाईला सामोरे जात आहेत. अखेर प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात संतप्त महिलांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयालाच टाळं ठोकत तीव्र आंदोलन छेडलं.
साठे नगर परिसरात मागील दोन महिन्यांपासून पाण्याचा पुरवठा अत्यंत कमी प्रमाणात होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना दररोज लांब अंतर चालत जावं लागत आहे. अनेक ठिकाणी हंडाभर पाण्यासाठी तासनतास रांगा लावाव्या लागत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे हाल होत आहेत.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या संदर्भात अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे तक्रारी करण्यात आल्या. मात्र, प्रशासनाने केवळ आश्वासनं देत वेळ काढला, कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली.
याच संतापातून आज साठे नगरातील महिलांनी एकत्र येत इस्लापूर ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळं ठोकत जोरदार घोषणाबाजी केली. “आधी पाणी, मगच कार्यालय” आणि “पाणी द्या, नाहीतर आंदोलन तीव्र करू” अशा घोषणा देत महिलांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.
महिलांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जोपर्यंत साठे नगर परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. आवश्यक असल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या घटनेनंतर ग्रामपंचायत प्रशासन आणि संबंधित यंत्रणांची धावपळ सुरू झाली आहे. मात्र, दोन महिन्यांपासून पाण्यासाठी त्रस्त असलेल्या नागरिकांना आता तातडीने दिलासा मिळणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
इस्लापूरमधील साठे नगर परिसरातील पाणीटंचाईचा प्रश्न आता प्रशासनासाठी मोठं आव्हान बनला आहे. आता ग्रामपंचायत आणि संबंधित विभाग किती लवकर उपाययोजना करतात, याकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागलं आहे.



